Screenshot_2026-05-14-18-37-12-77_96b26121e545231a3c569311a54cda96


खानापूर : शेतकऱ्यांना दिवसा अखंड आणि गुणवत्तापूर्ण वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री कुसुम योजना अंतर्गत खानापूर तालुक्यात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. तालुक्यातील दौडहोसूर, बागेवाडी, तोलगी आणि झुंजवाड (के.बी.) या चार गावांची प्राथमिक निवड करण्यात आली असून महसूल विभागाच्या मालकीच्या जमिनीवर हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

दोडहोसूर येथील शर्यतीचे मैदान असलेल्या याच सरकारी पड माळावर होणार सौर ऊर्जा प्रकल्प..


बेळगाव जिल्ह्यातील एकूण ३९ गावांची या योजनेसाठी निवड करण्यात आली असून सुमारे ९७२ एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कृषी पंपांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र सौर ऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांनाही रात्रीच्या ऐवजी दिवसा शेतीसाठी वीज वापरणे शक्य होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा केंद्रांमधून स्थानिक वीज उपकेंद्रांना थेट वीजपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे कृषी फीडर अधिक सक्षम होऊन विजेतील तांत्रिक अडचणी कमी होतील, असा दावा ऊर्जा विभागाकडून करण्यात येत आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात येणारी ही योजना ग्रामीण भागातील ऊर्जा स्वावलंबनासाठी महत्त्वाची मानली जात आहे. सौर ऊर्जेच्या माध्यमातून स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वीज निर्मिती होणार असल्याने कार्बन उत्सर्जनातही घट होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, महसूल विभागाच्या जमिनींची मोजणी, तांत्रिक पाहणी आणि आवश्यक प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू असून लवकरच प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर खानापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us