खानापूर लाईव्ह न्यूज : प्रतिनिधी
देशातील विविध राज्यांतील अलीकडील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रीय राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठल हलगेकर यांनी प्रतिक्रिया देताना मतदारांनी विकास, सुरक्षा आणि स्थिरतेच्या मुद्द्यांना प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी म्हटले की, निवडणुकांमध्ये जनतेने स्थानिक प्रश्नांसह एकूणच शासनाच्या कार्यपद्धतीचा विचार करून मतदान केले आहे. काही राज्यांमध्ये सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी दिसून आली असून, मतदारांनी बदलाच्या दिशेने कौल दिल्याचे चित्र आहे.
पश्चिम बंगालमध्येही सत्ताधारी सरकारविरोधात असंतोष असल्याचे जाणवले. कायदा व सुव्यवस्था, राजकीय वातावरण आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यांवर मतदारांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे राज्यातील निकाल हे बदलत्या जनमताचे संकेत असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, केंद्रातील Narendra Modi यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास कायम असल्याचेही या निकालांतून दिसून येते, असे हलगेकर यांनी सांगितले. तसेच Mamata Banerjee यांच्या नेतृत्वाखालील सरकारसमोर पुढील काळात अधिक आव्हाने उभी राहू शकतात, असेही त्यांनी सूचित केले.
आगामी काळातही मतदार विकासाभिमुख धोरणांना प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान खानापुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पश्चिम बंगाल, पांडिचेरी, आसाम या ठिकाणी भाजपने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल विजयस्तोव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवरायांना अभिवादन करून शिवस्मारक चौकात विजय उत्सवाच्या घोषणा देऊन पेढे वाटप करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.