file_00000000867c81fabed869c8967380fa


खानापूर : प्रतिनिधी
मराठा मंडळ संचलित मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूर येथे पीयूसी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत, कॉलेज मंत्रिमंडळाचा सत्कार तसेच शपथविधी आणि अकरावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. वाय. एच. अन्नगोळकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला मराठा मंडळ संस्थेचे कार्यकारी सदस्य परशराम गरव, कार्यकारी सदस्य शिवाजी पाटील, जीवन विद्या मिशन सद्गुरू श्री. वामनराव पै यांचे शिष्य व प्रबोधनकार सुहास अशोकराव शिरोडकर, ज्येष्ठ प्राध्यापक बी. के. उलगड्डी, निवृत्ती पाटील, सौ. साक्षी मुंचंडी, सौ. आशाताई गिनीगिने, अनंत लक्ष्मण कुंदेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत प्राध्यापक एम. एन. पाटील यांनी केले.
यावेळी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचा परिचय करून देण्यात आला. साधना देसाई यांनी शपथविधीचे वाचन केले. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी मंत्रिमंडळाचा गौरव करण्यात आला.
सन २०२५-२६ मध्ये अकरावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांची माहिती प्रा. आय. सी. सावंत यांनी दिली. बारावी विज्ञान शाखेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनी कु. मधुराणी मालशेट, कु. कांचन धुमणेकर आणि कु. सानिया धामणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा प्रबोधनकार सुहास अशोकराव शिरोडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्त, कठोर परिश्रम आणि चांगल्या सवयींचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी आई-वडील आणि गुरुजनांचा आदर राखावा, आपल्या चुका मान्य करून त्या सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, जीवनात संकटे आली तरी आत्मविश्वास न गमावता सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. मनावरील ताण कमी करण्यासाठी जीवनविद्येचे महत्त्व आणि विश्वप्रार्थनेचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमाला प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. एन. एम. सनदी यांनी केले, तर प्रा. एच. वाय. खंबळे यांनी आभार प्रदर्शन केले.

Do Share
error: Content is protected !!
Call Us