पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन; खानापूर तालुक्यात १९५ शिक्षकांची कमतरता
खानापूर : मराठी माध्यमाच्या शिक्षक पदांच्या सध्याच्या माध्यमनिहाय वाटपाचा तातडीने पुनर्विचार करून मराठी माध्यमासाठी स्वतंत्र शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी कर्नाटक सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
शिक्षक भरतीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेमध्ये मराठी माध्यमावर अन्याय झाल्याचा मुद्दा यावेळी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला. केवळ खानापूर तालुक्यात मराठी माध्यमाच्या सुमारे १९५ शिक्षकांची कमतरता असून, संपूर्ण कर्नाटकात ही संख्या अंदाजे ५८० ते ६५० इतकी आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.
मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रत्यक्षात उपलब्ध असलेल्या रिक्त शिक्षक पदांचा सध्याच्या भरती प्रक्रियेत समावेश करण्यासाठी विद्यमान अधिसूचनेचा तातडीने आढावा घेऊन सुधारित अधिसूचना जारी करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि संबंधित भाषिक माध्यमाचे ज्ञान असलेल्या पात्र उमेदवारांना समान संधी मिळेल, अशा पद्धतीने भरती प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करण्यात आली.
आरटीई कायदा २००९ अंतर्गत शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर पूर्ण करण्याबरोबरच संविधानातील अनुच्छेद ३५०-ए मधील तरतुदींचा विचार करून भाषिक अल्पसंख्याकांच्या मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पात्र शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या विषयाचा तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच शिक्षणमंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करून योग्य तो मार्ग काढू, असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रसाद पाटील, युथ काँग्रेस अध्यक्ष साईश सुतार, राष्ट्रवादी काँग्रेस बेळगाव जिल्हा सेक्रेटरी महांतेश कोळूचे यांच्यासह इतर उपस्थित होते.