खानापूर : हेब्बाळ गावचे मूळ रहिवासी मोहन केसरेकर व त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्या कुपवाड येथील हल्ल्यात झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ खानापूर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने गुरुवार, दि. 27 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
याबाबत बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामधामात बैठक घेण्यात आली. सकाळी 10 वाजता लक्ष्मी मंदिर येथे नागरिक व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. आरोपी फरीद अब्दुल शेख याच्यावर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा, तसेच फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार आहे.
दरम्यान, केसरेकर दाम्पत्याच्या लहान मुलांना आर्थिक आधार देण्यासाठी मदतनिधी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोर्चात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.