file_00000000e268720ba96a020b5e4c0c50


खानापूर : प्रतिनिधी
खानापूर येथील मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात आयोजित पालक मेळावा हा केवळ औपचारिक कार्यक्रम न ठरता पालकांना आपल्या जबाबदाऱ्यांचे भान करून देणारा आणि मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अरविंद पाटील होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संस्थेचे दिवंगत माजी अध्यक्ष शिक्षणमहर्षी कै. नाथाजीराव हलगेकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण वातावरण लाभले.
प्रास्ताविकात प्रा. एस. सी. कणबरकर यांनी शिक्षक-पालक-विद्यार्थिनी या त्रिसूत्रीचे महत्त्व अधोरेखित करत पालकांच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता स्पष्ट केली. पालक प्रतिनिधी संतोष सावंत यांनी मुलींच्या अभ्यासाकडे पालकांनी स्वतः लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. महिला प्रतिनिधी सौ. तुळसा चौगुले व रुबिया सनदी यांनी बदलत्या काळात मुलींमध्ये चांगले संस्कार, शिस्त आणि स्वकर्तृत्वाची प्रेरणा रुजविण्याचे महत्त्व पटवून दिले.
मेळाव्यातील विशेष आकर्षण ठरले ते प्रा. टी. आर. जाधव यांचे मार्गदर्शन. त्यांनी मोबाईलच्या वाढत्या अतिवापराबाबत चिंता व्यक्त करत पालकांनी आपल्या पाल्यांवर सतत लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. विद्यार्थिनींच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासात पालकांचा प्रत्यक्ष सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अरविंद पाटील यांनी पालकांना अंतर्मुख करणारे विचार मांडले. “पालक म्हणजे बागेचा माळी असतो. रोपट्याची योग्य निगा राखणे, त्याला खतपाणी देणे आणि अनावश्यक तण दूर करणे ही माळ्याची जबाबदारी असते. त्याचप्रमाणे मुलांच्या आयुष्यात योग्य संस्कार, शिस्त आणि मार्गदर्शन देणे हे पालकांचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
आजच्या स्मार्टफोनच्या युगात मुलांशी संवाद कमी होत चालल्याबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी पालकांनी मुलांच्या दैनंदिन शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष द्यावे, त्यांच्याशी नियमित संवाद साधावा आणि गरज पडल्यास शिक्षकांशी संपर्क ठेवावा, असा मोलाचा सल्ला दिला.
या प्रसंगी प्रा. पी. व्ही. कर्लेकर, प्रा. व्ही. एम. गावडे, प्रा. नितीन देसाई, प्रा. जे. एफ. शिवटणकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एम. वाय. देसाई यांनी केले.
विद्यार्थिनींच्या गुणवत्तावाढीसाठी घर आणि शैक्षणिक संस्था यांच्यातील समन्वय किती आवश्यक आहे, याची जाणीव करून देणारा हा पालक मेळावा उपस्थित पालकांसाठी प्रेरणादायी ठरला.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us