मिरज : हेब्बाळ येथील दुर्दैवी घटनेतील जखमी मोहन नागो केसरेकर यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, ते सध्या आयसीयूमध्ये लाईफ सपोर्टिंग सिस्टिमवर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यांची प्रकृती गंभीर मात्र स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सूचनेनुसार खानापूर काँग्रेसचे कार्यकर्ते आज मिरज शासकीय रुग्णालयात पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोहन केसरेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
यावेळी त्यांची कन्या मनाली मोहन केसरेकर यांचीही कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मनाली केसरेकर व श्रीहरी केसरेकर यांना सोबत घेऊन सर्वजण सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या कार्यालयात गेले.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी मनाली केसरेकर यांच्याशी चर्चा करताना, या प्रकरणात दोषींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचे सांगितले. तसेच कुटुंबीयांनी काळजी करू नये, असेही त्यांनी आश्वस्त केले.
केसरेकर कुटुंबीयांना तसेच त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक ती मदत करण्याबाबत जिल्हा प्रशासन, सेवाभावी संस्था, पोलीस विभाग आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध स्तरांवर चर्चा झाल्याचेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
मनाली केसरेकर यांच्याशी बोलताना, “तुला कधीही गरज वाटली तर माझ्या कार्यालयात ये; आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा विश्वासही पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिला.
यावेळी प्रसाद पाटील, साईश सुतार, संजय बावकर, म्हात्रू गुरव आणि सुरेश भाऊ उपस्थित होते.
केसरेकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली.
