खानापूर : सांगली येथील कुपवाड परिसरात रोजंदारीसाठी वास्तव्यास असलेल्या सीमा भागातील हेब्बाळ, ता. खानापूर येथील मोहन केसरेकर व त्यांच्या पत्नी मनीषा केसरेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला असून, मोहन केसरेकर जखमी झाले आहेत.
या प्रकरणातील नराधम आरोपीला कठोरात कठोर, कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी समितीच्या वतीने महाराष्ट्र मुख्यमंत्री फडवणीस यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सीमा भागातील अनेक युवक व कुटुंबे रोजगाराच्या शोधात महाराष्ट्रातील विविध भागांत रोजंदारीसाठी वास्तव्यास आहेत. भाड्याच्या घरात किंवा स्वतःच्या घरात राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.
कुपवाड येथे गेल्या काही वर्षांपासून रोजंदारीसाठी वास्तव्यास असलेल्या केसरेकर दाम्पत्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि गंभीर आहे. अशा घटनांमुळे सीमा भागातून महाराष्ट्रात रोजगारासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाण यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे.
“सीमा भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी मिळावी आणि केसरेकर कुटुंबाला न्याय मिळावा,” अशी भूमिका समितीने निवेदनातून मांडली आहे.