जांबोटी : “विद्यार्थी दशेत यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अपयश आल्यानंतर खडतर परिश्रमाच्या जोरावर त्याचे यशात रूपांतर करणे ज्याला जमते, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो,” असे गौरवोद्गार बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काढले.
जांबोटी (ता. खानापूर) येथील विश्व भारत सेवा समितीच्या माध्यमिक विद्यालयात बेळगाव रॉयल राऊंड टेबलच्या वतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या कुस्ती मॅट व व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन बोलत होते.
यावेळी विद्यालयाचा सुंदर परिसर, कष्टाळू शिक्षकवर्ग आणि आत्मविश्वासाने भरलेले विद्यार्थी पाहून आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. “विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. कष्ट करणाऱ्यांच्या प्रगतीच्या आड आर्थिक परिस्थिती कधीच येत नाही. आज अनेक आयएएस अधिकारी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीचा बाऊ न करता मेहनत, आत्मविश्वास आणि जिद्दीच्या जोरावर आपले भविष्य घडवावे,” असे आवाहन त्यांनी केले.
विद्यालयाची शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यालयाचे कौतुक केले. विद्यालयाच्या विकासासाठी प्रशासनाच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी रोहित सिंग यांच्या हस्ते फीत कापून कुस्ती व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला बेळगाव रॉयल राऊंड टेबलचे चेअरमन वरुण पाटील, विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदीहळळी, बेळगाव फाउंड्री क्लस्टरचे संचालक आनंद देसाई, कार्तिक मिस्कीन, रोहन सुंठणकर, आयुष्य दालमिया, क्रीडा भारतीचे राज्याध्यक्ष अशोक शिंत्रे, लैला शुगरचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील तसेच माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम कृष्णजी देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. वरुण पाटील व आनंद देसाई यांची समयोचित भाषणे झाली.
यावेळी राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये श्रावणी भरमाना पाटील (कुसमळी), भक्ती मनोहर गावडे (मोदीकोप), तनुजा रवींद्र गुरव (खानापूर) आणि त्रिवेणी विठ्ठल गावडे (आमगाव) यांचा समावेश होता.
कार्यक्रमास गावातील युवा वर्ग, पंचमंडळी, पालक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप सहशिक्षक दिनकर पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

