file_00000000728c821184282602e6a04a6c

काटगाळी नंतर आज शुक्रवारी नेरसा येथे आमदार विठ्ठल हलगेकर यांची विकासात्मक बैठक!

खानापूर : खानापूर तालुक्यातील नेरसा कर्यातीची आराध्यदेवता श्री महालक्ष्मी देवी ही नेरसा गावाची ग्रामदैवत असली, तरी तिची लाकडी मूर्ती कायम काटगाळी येथील मंदिरात वास्तव्यास असते, ही या यात्रेची अनोखी आणि शतकानुशतकांची परंपरा आहे. देवीवरील सर्व धार्मिक हक्क, मानपान आणि यात्रा भरविण्याचा अधिकार नेरसा पंच कमिटीकडे असून, मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चेचा मान काटगाळी येथील हक्कदारांकडे आहे.

२०२७ मध्ये तब्बल १८ वर्षांनंतर भरणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या नऊ दिवसीय यात्रा महोत्सवाच्या पूर्वतयारीला आता वेग आला आहे. गुरुवारी काटगाळी येथे विकासकामांबाबत बैठक पार पडली, तर शुक्रवारी नेरसा येथे आमदार विठ्ठलराव हलगेकर, विविध शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य पूर्वनियोजन ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी यात्रेच्या निमित्ताने रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, वाहतूक, आरोग्य सुविधा आणि इतर विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली. आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी यात्रेपूर्वी आवश्यक सर्व विकासकामे पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

अशी आहे देवीच्या आगमनाची अनोखी परंपरा!

यात्रेला सुमारे तीन महिने शिल्लक असताना काटगाळी येथे धार्मिक विधीनिशी देवीची ओठी भरणी करून मूर्तीचे विसर्जन केले जाते. त्यानंतर काटगाळीचे ग्रामस्थ देवीला नागुर्डा हद्दीपर्यंत आणून नेरसा पंच कमिटीकडे विधिवत सुपूर्द करतात. नेरसा येथे देवीला ‘भिजत’ घालून रंगकाम, अलंकार आणि विविध धार्मिक विधींना प्रारंभ होतो.

नऊ दिवसांचा यात्रा महोत्सव संपल्यानंतर पुन्हा धार्मिक विधीनुसार देवीचे विसर्जन करून नागुर्डा सीमेजवळ काटगाळी पंच कमिटीकडे मूर्ती सुपूर्द केली जाते. त्यानंतर देवीची काटगाळी येथील मंदिरात पुनःप्रतिष्ठापना केली जाते. या अद्वितीय परंपरेमुळे दोन्ही गावांमध्ये धार्मिक ऐक्य आणि भावनिक नाते अधिक दृढ झाले आहे.

१६ गावांची श्रद्धा; ऐतिहासिक यात्रेची परंपरा

नेरसा कार्यातीतील १६ गावांसाठी श्री महालक्ष्मी देवी ही श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. या देवीची यात्रा यापूर्वी १९४६, १९६१, १९९३ आणि २००८ या वर्षांत भरली होती. आता २०२७ मध्ये अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर एप्रिल किंवा मे महिन्यात ही ऐतिहासिक यात्रा भरणार असून, लाखो भाविकांच्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

काटगाळीत उभारले भव्य मंदिर

दरम्यान, श्री महालक्ष्मी देवीच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी काटगाळी येथे भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे यात्रेच्या तयारीबरोबरच दोन्ही गावांमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विकासकामांनाही गती मिळाली आहे.

श्रद्धा, परंपरा आणि विकास यांचा सुंदर संगम असलेली ही ऐतिहासिक यात्रा २०२७ मध्ये खानापूर तालुक्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात नवा अध्याय लिहिणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

18 वर्षांनंतर रंगणार नेरसा महालक्ष्मी यात्रा; आमदार हलगेकरांकडून विकासकामांचे आश्वासन

खानापूर : नेरसा ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या 2027 मधील भव्य यात्रेच्या पूर्वतयारीसाठी ग्रामसभा उत्साहात पार पडली. तब्बल 18 वर्षांनंतर यात्रा होत असल्याने कार्यक्षेत्रातील 16 गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सभेला आमदार विठ्ठलराव हलगेकर प्रमुख उपस्थित होते. यावेळी श्री लक्ष्मीदेवी यात्राोत्सव ट्रस्ट कमिटीने यात्रेनिमित्त हेम्मडगा–नेरसा, नेरसा–हणबरवाडा, नेरसा–कांजळा (देवीची वाट), मेन रोड–चाफावाडा रस्त्यांची दुरुस्ती, गावाचा रिंगरोड, अंतर्गत जोडरस्ते, पिण्याचे पाणी, गडगा परिसराचे सुशोभीकरण, एसटी बस, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि अखंड वीजपुरवठा यांसह विविध विकासकामांचे निवेदन आमदारांना दिले. त्यावर सर्व कामांना प्राधान्य देत आवश्यक सरकारी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आमदारांनी दिले.

सभेच्या अध्यक्षस्थानी धनंजय देसाई होते. यावेळी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी रमेश मेस्त्री, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, मल्लाप्पा मारीहाळ, शंकर पाटील, तालुका पंचायत चे माजी सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोक देसाई, ग्रामपंचायत पीडीओ, सदस्य, पंच कमिटीचे पदाधिकारी तसेच शेडेगाळी, गवाळी, असोगा, शिरोली, डोंगरगाव, हेम्मडगा, पाली, देगाव, मेंडील, जामगाव, अबनाळी, तेरेगाळी, तळेवाडी, कृष्णापूर, कोगळा, पास्टोली, कांजळा आदी 16 गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Do Share
error: Content is protected !!
Call Us