कक्केरी :विश्वकर्मा समाज विकास संघ! वर्धापन दिन उत्साहात साजरा
खानापूर: तालुक्यातील कक्केरी येथे आज विश्वकर्मा समाज विकास संघ व विश्वकर्मा खानापूर तालुका सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वकर्मा सेवा संघाचा द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमास कक्केरी मठाचे परमपूज्य रामानंद स्वामीजी यांचे दिव्य सानिध्य लाभले. प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार श्री विठ्ठलराव सोमण्णा हलगेकर, श्री प्रमोद कोचेरी, श्री संजय कुबल, सौ. धनश्री सरदेसाई, श्री मल्लाप्पा मारीहाळ, श्री पंडित ओगले, श्री भरमानी पाटील, श्री राजू पाटील, श्री मनोहर कदम, श्री सुनील प्रभू, श्री बाळेश चव्हाणावर, श्री दत्ता पाटील व श्री शिवानंद गोदोळी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री प्रसाद दोड्डेबेलकर होते. प्रारंभी तालुका संघटना अध्यक्ष श्री ज्योतिबा सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. त्यांनी विश्वकर्मा समाजाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेत समाज बांधवांनी एकत्रितपणे समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी आमदार श्री विठ्ठलराव सोमण्णा हलगेकर यांनी आपल्या भाषणात समाजातील युवकांनी शिक्षण, कौशल्य विकास व सामाजिक बांधिलकी यांना प्राधान्य द्यावे, असे सांगितले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रगती साधण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच विश्वकर्मा समाजाच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य देण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मान्यवरांनी अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कक्केरी व पंचक्रोशीतील विश्वकर्मा समाज बांधव तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. धार्मिक वातावरण, समाज एकतेचा संदेश आणि गुणवंतांचा गौरव यामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.