खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी :
लोकोळी, ता. खानापूर : ग्रामीण भागातील मातृभाषा आणि मराठी शाळा टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन येळूळर श्री चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे संस्थापक वाय. एन. मजुकर यांनी केले. ते लोकोळी येथील ज्ञानेश्वर विद्यालयात ३३ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या शारीरिक शिक्षक परशराम (पी. बी.) अंबाजी यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते.
विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात श्री. अंबाजी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तब्बल ३३ वर्षे एकाच संस्थेत सेवा बजावत त्यांनी आदर्श, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. यापैकी २१ वर्षे त्यांनी विनाअनुदानित शिक्षक म्हणून कार्य केले असून, त्यानंतरच्या काळात त्यांना पगारी शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली.
यावेळी बोलताना संस्थापक वाय. एन. मजुकर यांनी, “एक प्रामाणिक व समर्पित शिक्षक आज संस्थेतून निवृत्त होत असल्याची खंत वाटते. मराठी भाषा आणि मराठी शाळा जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,” असे आवाहन केले.
संस्थेचे सचिव प्रसाद मजुकर यांनीही आपल्या मनोगतात परशराम अंबाजी यांच्या कार्याचा गौरव केला. “अंबाजी सरांनी अनेक विद्यार्थी घडविले. संस्थेशी नाळ जुळवून काम करणारे शिक्षक आज दुर्मिळ झाले आहेत. त्यांनी संस्थेचा अविभाज्य घटक म्हणून सदैव कार्यतत्पर राहून सेवा बजावली,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी अंबाजी यांच्या प्रामाणिक सेवाभावाचा उल्लेख करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी परशराम अंबाजी व त्यांच्या पत्नीचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थित हितचिंतक, माजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि नागरिकांनी शाल व श्रीफळ देऊन दाम्पत्याचा सन्मान केला.
सत्काराला उत्तर देताना परशराम अंबाजी भावूक झाले. “या शाळेने मला आयुष्यात खूप काही दिले. अनेक विद्यार्थी घडविण्याची संधी मिळाली. आज शाळेला निरोप देताना अनेक आठवणी मनात दाटून येत आहेत. माझ्या हातून घडलेले विद्यार्थी जीवनात यशस्वी, सुखी आणि समृद्ध होवोत, हीच सदिच्छा. लोकोळी व परिसरातील नागरिकांनी दिलेले प्रेम माझ्या उत्तरार्धातील जीवनासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तुकाराम चव्हाण, मोहन पाटील, रुबीना सनदी, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, भरत खांबले, मल्लाप्पा हंगिरकर, पिराजी कुऱ्हाडे, रमेश धबाले, मारुती चोपडे, मनोहर पाटील, उदय पाटील, निवृत्त शिक्षक सिताराम बेडरे, रणजीत पाटील, अंबाजी यांचे कुटुंबीय तसेच चापगाव-लोकोळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक,मुख्याध्यापक पी डी पाटील, आर बी पाटील, नरेंद्र मजुकर, जे एम पाटील यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक एस. एम. येळूरकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
