oplus_6292480
चापगाव (प्रतिनिधी) :
द म शिक्षण मंडळ संचलित मलप्रभा हायस्कूल, चापगाव येथे आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने विद्यार्थ्यांचा पारंपरिक व भक्तिमय भव्य दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. टाळ, मृदंग व पखवाजाच्या निनादात जणू चापगावातच पंढरी अवतरल्याचा भक्तिमय अनुभव उपस्थितांना आला.
दिंडीत विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वारकरी तसेच विविध संतांच्या वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक पोशाखातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत गावातून दिंडी काढली. गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी दिंडीचे पुष्पवृष्टी व औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत केले.
दिंडीचा शुभारंभ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पिराजी कुराडे, ह.भ.प. वसंत पाटील, माजी सभापती सयाजी पाटील, माजी विद्यार्थी नारायण जांबोटकर, मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दिंडीला पुंडलिक भेकणे व पांडुरंग हलगेकर (यडोगा) यांनी पखवाजाची सुरेल साथ देत भक्तिमय वातावरण अधिक रंगतदार केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरा, वारकरी संस्कृती, भक्तीभाव आणि सामाजिक ऐक्याचे संस्कार रुजविण्यास मोठी प्रेरणा मिळाली. शेकडो विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण चापगाव परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.