खानापूर:
हलसी पशुआरोग्य केंद्राच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी साचले आहे. या साचलेल्या दूषित पाण्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, यामुळे दवाखान्यात येणारे नागरिक, रुग्ण आणि पशूपालकांना आपले नाक दाबूनच ये-जा करावी लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे स्थानिक ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, या साचलेल्या दूषित आणि गटाराच्या पाण्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने वाढला आहे. त्यामुळे गावात डेंग्यू, मलेरिया यांसारखे जीवघेणे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याकरिता याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी हालसी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आली आहे.
ग्रामस्थांचा संताप:
याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, “अनेक दिवसांपासून गटाराचे पाणी उघड्यावर साचत आहे. या गंभीर समस्येबाबत आम्ही ग्रामपंचायतीला वारंवार विनंती केली, परंतु प्रशासनाकडून याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे.”
तातडीने कारवाईची मागणी:
सध्या गावात रोगराई पसरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलावीत. साचलेले पाणी उपसून (साफ करून) परिसरातील गटारांची तातडीने स्वच्छता करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे.