IMG-20260525-WA0027


खानापूर : बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर नवीन रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेविरोधात गर्लगुंजी, नंदीहाळी व के. के. कोप्प परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवित केआयडीबीच्या विशेष भूअधिग्रहण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. “शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय पिकात पाय ठेवल्यास याद राखा,” असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला.
२०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी केआयडीबीचे विशेष भूअधिग्रहण अधिकारी मंजुनाथ डोंबर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्ग सुपीक जमिनीतून जात असल्याने गेल्या सात वर्षांपासून शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. “शेतकऱ्यांनी सुचविलेल्या नापीक जमिनी अधिग्रहित करा; मात्र सुपीक जमीन आम्ही कदापि देणार नाही,” अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
या जमिनीत वर्षातून तीन पिके व मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. तसेच परिसरात अवघ्या ५० ते ८० फुटांवर मुबलक पाण्याच्या शेकडो बोअरवेल्स असल्याने ही जमीन शेतकऱ्यांच्या जीवनाचा आधार असल्याचे सांगण्यात आले.
रेल्वेमार्ग झाल्यास वीज वाहिन्या, जनावरांची ने-आण, ट्रॅक्टरची वाहतूक, पाईपलाईन व्यवस्था आदी गंभीर समस्या निर्माण होतील, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. “राजकीय दबावाला बळी पडून काहींच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नका,” अशी विनंती प्रसाद पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रसाद पाटील, सुनील पाटील, संतोष पाटील, मारुती लोकूर, किरण लोंढे, राजेंद्र पाटील, पुंडलिक मेलगे, सुरेश जाधव, कृष्णा सिद्धानी, सुधाकर पाटील यांच्यासह गर्लगुंजी, नंदीहाळी, के. के. कोप्प, हलगीमर्डी, नागेनहट्टी गावांतील २०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us