IMG-20260514-WA0056


तालुक्यात २१ हजारांहून अधिक लाभार्थी वंचित;


खानापूर : शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांमधील वृद्ध, दिव्यांग आणि विधवा लाभार्थ्यांची पेन्शन अचानक स्थगित झाल्याने तालुक्यातील तब्बल २१ हजारांहून अधिक लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. या लाभार्थ्यांची पेन्शन तातडीने सुरू करून सर्वेक्षण प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी मागणी गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खानापूर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी दुंडप्पा कोमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, वृद्ध, दिव्यांग आणि विधवा व्यक्तींसाठी शासनाची पेन्शन योजना हा उदरनिर्वाहाचा मुख्य आधार आहे. महसूल विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षण प्रक्रियेमुळे अनेक पात्र लाभार्थ्यांचे वेतन थांबले असून त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्व तलाठी, महसूल निरीक्षक व नायब तहसीलदार यांनी योग्य पद्धतीने सर्वेक्षण करून पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार दुंडप्पा कोमार यांनी योग्य सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्यात येईल तसेच पात्र लाभार्थ्यांची पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास शिष्टमंडळाला दिला.
त्याचबरोबर तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबतही हेस्कॉम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, दुरुस्ती, फांद्या कटिंग व इतर कामे पूर्ण करून वीज व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी प्रसाद पाटील, प्रमोद सुतार, परशराम बेळगावकर, रामचंद्र लोहार, मर्यप्पा पाटील आदी उपस्थित होते.

Do Share
error: Content is protected !!
Call Us