खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
श्री नागेश महारुद्र मंदिर येथे जीर्णोद्धार करण्यात आलेल्या स्थळ देवत व ग्रामदैवत मंदिराचा पुनः प्राणप्रतिष्ठापना व उद्घाटन सोहळा मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे.
मौजे नागुर्डा, नागुर्डवाडा व विशांतवाडी (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथील ग्रामस्थांच्या वतीने हा धार्मिक सोहळा गुरुवार दि. 14 मे 2026 ते शनिवार दि. 16 मे 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, पूजा-अर्चा, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मंदिर उद्घाटन सोहळ्यास आमदार रोहित आर. आबा पाटील यांची राहणार उपस्थिती!
श्रीनागेश महारुद्र पुनः प्राणप्रतिष्ठापना व उद्घाटन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. पीर योगी सिंगनाथाजी महाराज बालेवाडी मठ यांच्या दिव्य सानिध्यात कळसारोहण होणार आहे.
शुक्रवार दि. 15 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता मंदिराचे उद्घाटन मा. श्रीमंत सरकार निरंजनसिंह उदयसिंह सरदेसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी मंदिर मुख्य प्रवेशद्वाराचे उद्घाटन महाराष्ट्रातील तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित आर. आबा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच गाभाऱ्याचे उद्घाटन विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमात विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून दीपप्रज्वलन आणि देवतांच्या प्रतिमांचे पूजनही करण्यात येणार आहे.
दि. 14 रोजी मूर्ती पुनः प्राणप्रतिष्ठापना!
श्री नागेश महारुद्र मंदिर येथे गुरुवार दि. 14 मे 2026 रोजी सकाळी 7 वाजता पुनः प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला प्रारंभ होणार असून धार्मिक विधी, भजन, कीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य देवता श्री नागेश महारुद्र देवतांची पुनः प्राणप्रतिष्ठापना बाळेकुंदी मठाचे महंत प. पू. पीर योगी सिंगनाथजी महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात पार पडणार आहे. यामध्ये पंचधातूच्या कळसाचे कळसारोहण, पाषाणातील श्री गणेश मूर्ती, नंदी मूर्ती तसेच कासव प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना व तुळस पूजन होणार आहे.
यावेळी विविध देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना, मुख्य प्रवेशद्वार व चौकट पूजन, गाभारा प्रवेशद्वार पूजन तसेच उत्तर-दक्षिण प्रवेशद्वार पूजनाचे धार्मिक विधी पार पडणार आहेत.
सायंकाळी महिला मंडळाचे हरिपाठ, संगीत भजन, कीर्तन आणि जागर भजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
तिसरा दिवस: दि. 16 रोजी रात्री नागुर्डवाडा ग्रामस्थांच्या सहभागातून “डाकू संग्राम” या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.