IMG-20260510-WA0012


दोन सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावून केले खानापूरचे नाव उज्ज्वल.

खानापूर लाईव्ह न्युज/ प्रतिनिधी :
वर्ल्ड ऍथलेटिक डे चॅम्पियनशिप 2026 निमित्त स्कूल ऑलिम्पिक फेडरेशन व यंगस्टर्स स्पोर्ट्स क्लब, बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने 7 मे 2026 रोजी बेंगलोर येथील राणी चन्नम्मा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अथलेटिक्स स्पर्धेत खानापूर तालुक्यातील गुंडपी गावचा उदयोन्मुख धावपटू सुशीलकुमार मर्याप्पा पाटील याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
सर्वोदय हायस्कूल खानापूर येथे इयत्ता सातवीत शिक्षण घेत असलेल्या सुशीलकुमारने 13 वर्षाखालील गटात 80 मीटर हारडल्स स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. तसेच 4×100 मीटर रिलेमध्येही प्रथम क्रमांक मिळवत आणखी एक सुवर्णपदक आपल्या नावे केले. याशिवाय 80 मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकही पटकाविले. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे खानापूर तालुक्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल झाले आहे.
सुशीलकुमार हा अवघ्या सहा वर्षांपासून अथलेटिक्सचा नियमित सराव करत असून आजपर्यंत शाळा, तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरीय विविध स्पर्धा व मॅरेथॉनमध्ये सहभागी होत अनेक यश संपादन केले आहे. तो ज्योती अथलेटिक स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही सत्रात कठोर सराव करत आहे.
त्याला ज्योती स्पोर्ट्स क्लबचे ज्येष्ठ प्रशिक्षक एल. जी. कोलेकर व प्रशिक्षक अनिल गोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच सर्वोदय शाळेचे मुख्याध्यापक नेल्सन पिंटो, शारीरिक शिक्षक जिजो डिसोजा, प्रशिक्षक संतोष देवलतकर आणि पालक मर्याप्पा कृष्णाजी पाटील यांचे प्रोत्साहन मिळत आहे.
सुशीलकुमारच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Do Share
error: Content is protected !!
Call Us