खानापूर: प्रतिनिधी. खानापूर तालुक्यात मागील पाच वर्षात अनेक रस्त्यांच्या तसेच पाणी प्रश्नांचा पाठपुरावा माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केला आहे. पण या पाणी तसेच रस्त्यांच्या कामापैकी बरीच कामे कागदावरच आहेत. तर बरीच कामे आजही निधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे जिल्हा पंचायत उपविभाग तसेच ग्रामीणपाणी पुरवठा आणि निर्मल्य विभाग अंतर्गत येणाऱ्या विकास कामाचा आढावा गुरुवारी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी घेतला. खानापूर येथील विश्रामधामात आमदार विठ्ठल हलगेकर यांनी जिल्हा पंचायत उपविभागाचे कार्यकारी अभियंता मठपती तसेच विभागीय अभियंते खन्नूकर यांच्याशी चर्चा केली यावेळी भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी ताप सदस्य अशोक देसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य ज्योतिबा रेमाणि, पत्रकार पिराजी कुराडे, लक्ष्मण बामणे, लक्ष्मण झांजरे, शंकर पाटील आदी उपस्थित होते.
खानापूर तालुक्यात पाणीपुरवठा योजना बऱ्याच ठिकाणी अर्धवट आहेत. जल जीवन मिशन योजना लवकरात लवकर कारव्यान्वित करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांना सूचना देण्यात याव्यात. कोणत्याही प्रकारचा हलगर्जी पणा करण्यात येऊ नये.ज्या गावात काम अर्धवट आहेत ती कामे संबंधित कंत्राटदाराला पावसाळ्यापूर्वी सुरू करण्याची सूचना करण्यात यावी तसेच जंगल प्रदेशात जलजीवन मिशनमध्ये वन खात्याकडून येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून त्या सोडवण्यासाठी आमदार हलगेकर यांनी सूचना केल्या आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक गावात पिण्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून ज्या ज्या गावात पिण्याची समस्या आहे त्या ठिकाणी त्वरित बोरवेल खुदाई करण्यात यावी. किंवा आवश्यक अशा ठिकाणी उपसा पाणी योजना राबवण्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा असे सांगितले.
प्रामुख्याने कर्नाटक सरकारच्या महत्त्वकांक्षी “देगाव ‘ पाणी योजनेअंतर्गत खानापूर तालुक्यातील 135 गावांना सुबद्ध पाणीपुरवठा करण्याची योजना मागील राज्य सरकारने मंजूर केली आहे. कित्तूर व खानापूर तालुक्यात तब्बल सहाशे पाच कोटी रुपये या योजनेसाठी खर्च करण्यात येणार असून यामध्ये एकूण 165 गावांचा समावेश आहे. त्यापैकी खानापूर तालुक्यात 135 गावांना कशा पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्या गावची नावे व आराखडा यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांच्यासमोर जिल्हा पंचायत कार्यकारी अभियंते मठपती यांनी मांडला. शिवाय खानापूर तालुक्यात 15 कोटी हून अधिक कामे राज्य शासनाच्या दरबारी प्रलंबित आहेत. यापैकी काही कामे प्रगतीपथावर आहे. तर काही नोटिफिकेशन करून टेंडरच्या प्रतीक्षेत आहेत. ही सर्व कामे पूर्णत्वाला आल्यानंतर तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे पूर्ण होतील असे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. त्यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी खानापूर तालुक्यात मागील काळात झालेल्या कामाचा आढावा व मंजूर झालेल्या कामाचा आराखडा अभ्यास सुरू करून कोणती कामे हाती घेण्यात यावीत या संदर्भ लवकरच व्यापक बैठक घेऊन सूचना करण्यात येणार असल्याचे सांगितल. सार्वजनिक बांधकाम खाते अंतर्गत येणारे रस्ते व जिल्हा पंचायत खाते अंतर्गत येणारे रस्ते याची वेगळी यादी तयार करून याचा योग्य पाठपुरावा राज व केंद्र शासनाकडे करून अधिकाधिक निधी आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून अधिकाऱ्यांनी ही पारदर्शक रित्या आम्हाला माहिती द्यावी. असे आमदार हलगेकर यांनी सांगितले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या मूलभूत समस्या, अत्यावश्यक रस्त्यांची माहिती अधिकाऱ्यांना देऊन तात्काळ दुरुस्ती करण्याची सूचना केली.