राणी चन्नम्मा चषकावर मराठा मंडळ ताराराणीच्या महिला शिलेदारांची मोहोर!
राणी चन्नम्मा चषकावर मराठा मंडळ ताराराणीच्या महिला शिलेदारांची मोहोर!
बैलहोंगल संघाचा ६ गुणांनी पराभव; राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत खानापूरच्या मुलींचा दणदणीत विजय
खानापूर / प्रतिनिधी : ऐतिहासिक कित्तूर नगरीत कित्तूर उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या राणी चन्नम्मा भव्य चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय, खानापूरच्या महिला कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावत ऐतिहासिक यश संपादन केले. आपल्या जिद्दीच्या, कौशल्याच्या आणि सांघिक खेळाच्या जोरावर या रणरागिणींनी मानाच्या चषकावर आपले नाव कोरले आहे.
कित्तूरच्या ऐतिहासिक भूमीत झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत ताराराणी महाविद्यालयाच्या महिला संघाने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी केली. रामदुर्ग, कडोली, कोप्पळ, बिडदी, हुबळी, गोकुळ आणि बैलहोंगल यांसारख्या बलाढ्य संघांना पराभूत करत खानापूरच्या मुलींनी आपल्या खेळाचा ठसा उमटवला.
अंतिम सामन्यात बैलहोंगल संघावर मात!
स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. दोन्ही संघांकडून विजयासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मात्र, ताराराणीच्या महिला खेळाडूंनी उत्कृष्ट बचाव आणि आक्रमक चढायांच्या जोरावर बैलहोंगलच्या बलाढ्य संघाचा सहा गुणांच्या फरकाने पराभव केला. या विजयासह त्यांनी प्रथम क्रमांकाचा मान मिळवला. विजेत्या संघाला भव्य चषकासह रोख ८ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
पहिल्याच सामन्यापासून विजयाची घोडदौड!
स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गदग संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ताराराणीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट बचाव आणि वेगवान चढायांच्या जोरावर तब्बल १८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. त्यानंतरही त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी करत प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली.
विशेष म्हणजे, खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या या विद्यार्थिनींनी आपल्या नैसर्गिक कौशल्याच्या, कठोर परिश्रमाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक बलाढ्य संघांना घाम फोडला. मर्यादित साधनसामग्रीतून जिद्दीने सराव करून मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील खेळाडूंच्या क्षमतेची साक्ष देणारे ठरले आहे.
खानापूरच्या लेकींच्या जिद्दीचा विजय!
हा विजय केवळ एका कबड्डी स्पर्धेतील यश नसून खानापूर तालुक्यातील मुलींच्या आत्मविश्वासाचा, मेहनतीचा आणि क्रीडाक्षेत्रातील उज्ज्वल क्षमतेचा गौरव आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे संपूर्ण परिसरातून विजयी संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू (हलगेकर) यांच्या मार्गदर्शनामुळे आणि प्रोत्साहनामुळे खेळाडूंना नवी ऊर्जा मिळाल्याचे सांगण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अरविंद पाटील, क्रीडाशिक्षक श्री. प्रशांत पाखरे, भीमसेन, भरमाजी पाटील तसेच संपूर्ण प्राध्यापकवर्गाने विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. संस्थेचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील आणि श्री. परशराम गुरव यांनीही या जिगरबाज खेळाडूंच्या यशाचे कौतुक केले.
खानापूरच्या लेकींची भरारी; ताराराणीच्या शिरपेचात मानाचा तुरा!
राणी चन्नम्माच्या शौर्यभूमीत मिळवलेल्या या विजयाने मराठा मंडळ ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, खानापूर तालुक्याच्या क्रीडाक्षेत्रासाठी ही अभिमानास्पद आणि प्रेरणादायी कामगिरी ठरली आहे.