Home » जांबोटीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसकडून दीपक कवठणकर इच्छुक!

जांबोटीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसकडून दीपक कवठणकर इच्छुक!

file_00000000d0bc8211933992d6a151a1c6

जांबोटीच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसकडून दीपक कवठणकर इच्छुक!

माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे निकटवर्तीय; जनसंपर्क आणि सामाजिक कार्याच्या बळावर उमेदवारीसाठी प्रयत्न

खानापूर / प्रतिनिधी : खानापूर तालुक्यातील जांबोटी जिल्हा पंचायत मतदारसंघात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असतानाच आता काँग्रेस पक्षाकडूनही या मतदारसंघात उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते आणि देवाचीहट्टी येथील दीपक कवठणकर यांनी जांबोटी जिल्हा पंचायत मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे खानापूर लाईव्हशी बोलताना स्पष्ट केले.

दीपक कवठणकर हे गेल्या अनेक वर्षांपासून ब्लॉक काँग्रेस पक्षाशी संबंधित असून, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. डॉ. निंबाळकर यांच्या आमदारकीच्या काळात काँग्रेसच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली होती. सध्या कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असून, सरकारच्या विविध हमी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.

सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा

आपला व्यवसाय सांभाळत सामाजिक कार्यात सक्रिय असलेले दीपक कवठणकर हे जांबोटी जिल्हा पंचायत क्षेत्रातील विविध गावांमधील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. जंगल परिसरातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणारे नुकसान, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यावर तोडगा काढण्यासाठी ते पाठपुरावा करत असल्याचे सांगितले जाते.

मान गावातील अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा पाय काढावा लागला होता. या पीडित व्यक्तीला सरकारकडून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येतो. याशिवाय आमगाव, कोंगळा, पास्टोली आणि गव्हाळी परिसरातील नागरिकांच्या विविध प्रश्नांवरही त्यांनी काम केल्याचे सांगण्यात येते.

हमी योजनांच्या माध्यमातून जनसंपर्क

कर्नाटक सरकारच्या गृहलक्ष्मी, गृहज्योती आणि शक्ती यांसारख्या हमी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यात त्यांच्या कुटुंबाचाही सहभाग आहे. त्यांच्या पत्नी खानापूर तालुका हमी योजना समितीच्या सक्रिय सदस्या म्हणून कार्यरत आहेत. तालुका भुलवाद मंडळावर सरकार नियुक्त सदस्य आहेत. त्यामुळे सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आणि नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क वाढल्याचे मानले जाते.

जांबोटीमध्ये राजकीय चुरस वाढणार?

जांबोटी जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्याकडून इच्छुकांची चर्चा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत दीपक कवठणकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने या मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

दीर्घकाळ पक्षाशी असलेली नाळ, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याशी असलेले निकटचे संबंध आणि स्थानिक प्रश्नांवरील सक्रियता या बाबींच्या आधारे ते पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार आहेत. मात्र, काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.

जांबोटीच्या राजकीय बालेकिल्ल्यात कोण बाजी मारणार आणि काँग्रेसकडून दीपक कवठणकर यांना संधी मिळणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

खानापूर लाईव्ह | प्रतिनिधी

Do Share
error: Content is protected !!
Call Us