खानापूर ) प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी आयुष्यात स्पष्ट ध्येय निश्चित करून सकारात्मक विचार, आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्याच्या बळावर यश संपादन केले पाहिजे. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपल्यास आजची विद्यार्थिनी भविष्यातील सक्षम ‘ताराराणी’ म्हणून घडेल, असे प्रेरणादायी प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, हलकर्णी येथील प्रसिद्ध अभ्यासक प्रा. डॉ. मधुकरराव जाधव यांनी केले.
मराठा मंडळ ताराराणी हायस्कूल व महाविद्यालयात शिक्षणमहर्षी कै. नाथाजीराव साहेब यांच्या २१ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित ‘शिक्षण उपक्रम दिन’ उत्साहात व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परशुरामअण्णा गुरव सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव पाटील सर उपस्थित होते.
प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. जाधव यांनी ‘माझं ध्येय आणि माझं मन’ तसेच ‘ताराराणी : काल, आज आणि उद्या’ या विषयांवर विद्यार्थिनींना प्रभावी मार्गदर्शन केले. आपल्या ४० मिनिटांच्या ओघवत्या भाषणात त्यांनी केवळ स्वप्ने पाहून चालत नाही, तर ‘माझं ध्येय आणि मी’ या नात्याची जाणीव ठेवून कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करावे, असे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज, वीरमाता जिजाऊ, छत्रपती ताराराणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात मोठी आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थिनींनी संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि नेतृत्वगुण जोपासून उद्याच्या सक्षम समाजनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित विद्यार्थिनींमध्ये नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी केले. त्यांनी शिक्षणमहर्षी कै. नाथाजीराव साहेब यांच्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक योगदानाची आठवण करून दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी.यू. कॉलेजच्या शिक्षिका सुनीता कणबरकर व मंगल देसाई यांनी केले. हायस्कूलचे मुख्याध्यापक राहुल जाधव यांनी कै. नाथाजीराव साहेब यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.
या शिक्षण उपक्रम दिनास हायस्कूल व महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.