प्रतिनिधी/ पिराजी कुऱ्हाडे
2023 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज लागला आहे. यामध्ये खानापूर तालुक्याचा दहावीचा निकाल 89 टक्के लागला आहे. यावर्षीच्या दहावीच्या निकालाने उच्चांक राखला असून मागील वर्षाची सरासरी जवळपास15 टक्क्याने वाढली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये खानापूर तालुक्याने यावर्षी दुसरा क्रमांक पटकावला आहे रामदुर्ग तालुक्याने 92.95% गुण घेऊन जिल्ह्यात पहिला क्रमांक राखला आहे. तर खानापूर तालुक्याने 89.94% गुण घेऊन जिल्ह्यात दुसरा क्रमांक साधला आहे.
सर्वोदया विद्यालयाची कू. सोनाली पाटील तालुक्यात प्रथम
खानापूर तालुक्यातून सर्वोदया विद्यालयाची विद्यार्थिनी कू.सोनाली डी. पाटील 625 पैकी 615 गुण घेऊन खानापूर तालुक्यात पहिला आली आहे. तर होलीक्रॉस इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थिनी कू.पद्मावती बेडगी हिने 614 गुण तालुक्यात दुसरा तर संगोळी रायान्ना वस्ती शाळेचा विद्यार्थी श्रीकांत देसाई याने 613 गुण तालुक्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
ताराराणीची विद्यार्थिनी कु. संचिता पाटील मराठी विभागात जिल्ह्यात दुसरा
खानापूर येथील मराठा मंडळ संचलित तारारणी हायस्कूलची विद्यार्थिनी कु.संचिता शरद पाटील कुपटगिरी हिने मराठी विभागात 625 पैकी 606 गुण {96.96%} घेऊन बेळगाव जिल्ह्यात दुसरा आली आहे. तर खानापूर तालुक्यात मराठी विभागात पहिला आली आहे. कु. संचिता पाटील ही कूपटगिरी येथील सामाजिक कार्यकर्ते व लैला साखर कारखान्याचे फिल्डमन शरद पाटील यांची मुलगी होय. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे अभिनंदन होत आहे.
दहा शाळांचा 100 टक्के निकाल
खानापूर तालुक्यात अनुदानित व विनाअनुदानित तसेच वस्ती अशा जवळपास 65 माध्यमिक शाळा आहेत यामध्ये खानापूर तालुक्यातील दहा शाळांनी शंभर टक्के निकाल राखला आहे. यामध्ये प्रामुख्याने आजीलियन इंग्रजी स्कूल नंदगड, ज्ञानेश्वर विद्यालय लोकोळी, डॉ.बी. आर.आंबेडकर विद्यालय बिडी, कित्तुर राणी चन्नम्मा वस्तीशाळा जांबोटी, मेडलिन इंग्लिश विद्यालय लोंढा, मराठा मंडळ हायस्कूल कापोली, संगोळी रायान्ना वसती शाळा नंदगड, माऊली विद्यालय गर्लगुंजी, माऊली विद्यालय कणकुंबी व उर्दू हायस्कूल खानापूर या माध्यमिक शाळांचा समावेश आहे.
तालुक्यात यावर्षीही विद्यार्थिनींची सरशी
खानापूर तालुक्यातून यावर्षी 3498 विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षेला बसले होते त्यापैकी 3146 विद्यार्थी विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 1624 विद्यार्थिनी तर 1522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण आकडेवारी पाहता यावर्षीही तालुक्यातील विद्यार्थिनींनीच सरशी साधली आहे.