जांबोटी / प्रतिनिधी :
गेल्या 68 वर्षात सीमा भागातील मराठी भाषिकांवर यां ना त्या प्रकारे अत्याचार करण्याची भूमिका कर्नाटक सरकारने घेतली आहे. कानडीकरणाचा वरवंटा फिरवत सीमा भागातील मराठी भाषिकांना वारंवार डिवचण्याचा प्रकार होत असताना महाराष्ट्रातील अनेक राष्ट्रीय पक्षाचे नेते किंवा स्थानिक पक्षीय नेते,मराठी भाषिकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत हे चुकीचे आहे. मराठी भाषा आणि संस्कृती तसेच आपल्या मायबोलीत जाण्यासाठी अखंडपणे तेवत ठेवलेला हा लढा जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कायम राहील. सीमा वासियांच्या पाठीशी आपण नेहमी साथ देणार असून मराठी भाषेवर अन्याय झाल्यास जशास तसे उत्तर देण्याची भूमिका आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडे असेल असे उद्गार राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते रोहित पाटील यांनी व्यक्त केले.
मंगळवारी जांबोटी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा व भव्य रॅली काढण्यात आली. या जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक अरविंद कळेकर गुरुजी होते.
प्रारंभी उपस्थितचे स्वागत कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी केले. बोलताना उमेदवार मुरलीधर पाटील म्हणाले, जांबोटी भाग हा समितीचा बालेकिल्ला आहे. गेल्या 65 वर्षांमध्ये या भगाने नेहमी सीमा प्रश्न आणि समितीची साथ दिली आहे. ही परंपरा यापुढेही या भागातील मराठी भाषिकांनी कायम ठेवावी राष्ट्रीय पक्षाच्या वळचणीला न जाता मराठी भाषा व संस्कृती जतन करण्यासाठी समितीचा झेंडा हातात घेऊन प्रत्येकाने येत्या 10 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या स्टूल या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे. मी तुमचा सेवक या नात्याने मराठी भाषा, संस्कृती जतना बरोबर या भागाच्या विकासासाठी कार्यतत्पर राहील असे विचार व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, ज्येष्ठ नेते मारुतीराव परमेकर,आबासाहेब दळवी, जयराम देसाई, नारायण कापोलकर, गोपाळराव पाटील, निरंजन सरदेसाई यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सभेला हजारोच्या संख्येने मराठी भाषिक मतदारांनी सहभाग दर्शवला होता. सभा पार पडल्यानंतर जांबोटी गावातून भव्य रॅली काढण्यात आली.