गेल्या साडेचार वर्षांपासून खानापूर म.ए.समितीच्या संघटनेत दुही माजली होती. त्यानंतर अनेकवेळा एकीचे प्रयत्न होऊनही ती सांधता आली नव्हती. काळ्यादिनी १ नोव्हेंबर रोजी गर्लगुंजी येथील माऊली ग्रूपने एकीसाठी प्रयत्न केले. पण, कांहींच्या आडमुठेपणामुळे तो प्रयत्न फसला होता. त्यानंतर माऊली ग्रूप आणि समितीनिष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती म.ए.समितीच्या नेत्यांची भेट घेऊन एकीची गळ घातली होती. त्यानुसार आज बुधवारी (ता.०९) शिवस्मारकात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मतांचा विचार करून मध्यवर्तीने दोन्ही गटांना एकत्र येण्यासाठी यापूर्वीचे हेवेदावे विसरण्याचे आव्हान केले. एकीच्या प्रकियेची सुरूवात म्हणून माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या गटातून प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे, रमेश धबाले, हणमंत मेलगे आणि गोपाळ देसाई यांच्या गटातून गोपाळ देसाई, धनंजय पाटील, किशोर हेब्बाळकर आणि राजू पाटील यांची निवड करण्यात आली आहे. हे आठ सदस्य येत्या महिनाभरात तालुक्यातील प्रत्येक मराठी गावात जाऊन प्रत्येकी गावातून एका सदस्याची निवड करतील. त्यानंतर त्यांच्यातून कार्यकारिणी सदस्यांची निवड जाहीर करण्यात येणार असल्याचे मध्यवर्तीच्या नेत्यांनी जाहीर केले.
आजच्या बैठकीत कांही कार्यकर्त्यांनी हेवेदावे काढल्याने कांही काळ गोंधळ निर्माण झाला होता. पण मध्यवर्तीच्या नेत्यांनी आम्ही तुमच्यात एकी करायला आलोय, त्यासंदर्भात बोला. गोंधळ घालू नका असा सल्ला दिला. त्यानंतर दोन्ही गटांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने एकीची प्रक्रिया सुलभ झाली. यावेळी प्रकाश मरगाळे, ॲड. राजाभाऊ पाटील, एम.जी पाटील, विकास कलघटगी आदी नेते उपस्थित होते. नारायण कापोलकर यांनी बैठकीचे सुत्रसंचालन केले.
दोन्ही गटांच्या चुका झाल्या आहेत. त्याची कल्पना मध्यवर्तीच्या नेत्यांना आहे. त्यामुळे तुम्ही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी एकी कशी करता येईल. याबाबत मते मांडा. येत्या निवडणुकीत खानापुरातून पुन्हा भगवा फडकावण्यासाठी प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा. कुणाचाही मुलाहिजा न राखता मध्यवर्तीने सर्वांना एकीसाठी आव्हान केले आहे. आम्ही योजलेल्या नियोजनानुसार खानापूर म.ए.समितीची आगामी वाटचाल असेल.
– प्रकाश मरगाळे, मध्यवर्ती म.ए.समिती नेते-बेळगाव