

फोटो : मंजुनाथ भारती स्वामी
खानापूर :
राज्यातील मराठा समाजाचे संघटन आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचे चिंतन करुन जनजागृती करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवार दि. 30 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता सौंदत्ती रोड धारवाड येथे कर्नाटक राज्य क्षत्रिय मराठा समाजाची जागृती महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. बेंगलोर येथील गोसाई मठाचे मठाधीश मंजुनाथ भारती स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन धारवाडचे पालकमंत्री संतोष लाड हे करणार असून मराठा विद्या प्रसारक मंडळ धारवाडचे अध्यक्ष मनोहर मोरे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून माजी गृहमंत्री पी. जी. आर. सिंधिया, माजी मंत्री श्रीमंत पाटील, मराठा विकास महामंडळाचे एमडी प्रकाश पागोजी, आमदार श्रीनिवास माने, विधान परिषद सदस्य एम. जी. मुळे, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर, माजी आमदार रूपाली नाईक, माजी आमदार अनिल बेनके उपस्थित राहणार आहेत. हल्याळ या ठिकाणी मराठा समाजाचे भव्य गुरुकुल उभारण्याचे काम सुरू आहे. या गुरुकुलच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण, रोजगार तसेच करिअर संदर्भात मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या गुरुकुल निर्माण कार्याच्या प्रगतीचाही सभेत आढावा घेण्यात येणार आहे. नववर्षाच्या निमित्ताने मराठा समाजाची सशक्त संघटना उभारून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आणि राज्यातील मराठा समाजाला संघटित करण्यासाठी जागृती महासभेला मराठा समाजाच्या महिला, विद्यार्थी, युवक-युवती आणि समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंजुनाथ भारती स्वामी यांनी केले आहे.