खानापूर: ‘बेळगाव,कारवार, निपाणी, खानापूरसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’च्या जयघोष करीत सहभागी झालेल्या हजारो कार्यकर्त्यांनी रविवारी खानापूर शहर दणाणून सोडले. हातात भगवेध्वज, डोकीवर फेटे आणि कपाळावर शेंदूर लावून मराठी भाषिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते, त्यामुळे शहर जणू भगवेमय झाले होते. पाटील यांचे उस्त्फुर्द स्वागत करून विजयी करण्याचा वज्रनिर्धार करण्यात आला.
गावागावातून समितीला उस्त्फुर्द प्रतिसाद मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मंडळांनी पाठींबा दर्शवित रॅलीत सहभाग दर्शविला होता. शहरातील विविध गल्ल्यांमधून प्रचारफेरी काढण्यात आली. प्रचंड गर्दीमुळे ही प्रचारफेरी लक्षवेधी ठरली. प्रचारफेरीदरम्यान महिलांनी मुरलीधर पाटील यांना आरती करून त्यांचे औक्षण केले. तर ठिकठिकाणी त्यांना नागरीकांनी निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा देत पाठींबा दर्शविला.
निंगापूर गल्लीवासीयांनी यावेळी मुरलीधर पाटील यांना १०० टक्के पाठींबा जाहीर करीत जागृत चव्हाटा देवस्थानासमोर गाऱ्हाणा घालून विजयासाठी साकडे घातले. प्रचारफेरीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते-कार्यकर्ते आणि शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.