खानापूर : गेल्या 2021 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाचा पहिल्या 30 महिन्याचा कालावधी जून अखेर संपणार आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यभार संपुष्टात आला असुन उर्वरित पुढील अडीच वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचे आरक्षण येत्या 19 जुन रोजी जाहीर होणार आहे.
पहिल्या 30 महिन्यातील अध्यक्ष उपाध्यक्षांचा कालावधी जून अखेर व जुलै च्या पहिल्या पंधरावड्यात संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आगामी 30 महिन्याच्या काळासाठी होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या आरक्षणासाठी सोमवारी दि. 19 रोजी होणाऱ्या कार्यक्रमासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार व तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे आता खानापूरात तालुक्यातील 51 ग्राम पंचायतीच्या सदस्याचे लक्ष आरक्षणाचे लागुन आहे.
खानापूर तालुक्यात 51 ग्रामपंचायत पैकी बहुतांश ग्रामपंचायतीवर भाजप काँग्रेस तसेच समितीच्या अनेक सदस्यांची अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची वर्णी लागली होती . आता खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असल्याने येत्या ग्रामपंचायत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत इच्छुकांची पुन्हा एकदा लॉबी लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या आरक्षणाकडे खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष लागले आहे.