खानापूर/ पिराजी कुऱ्हाडे; खानापूर विधानसभा मतदारसंघात चुरशीने 75.31 टक्के मतदान झाले आहे. 1,60,160 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे आता खानापूरचा सत्ताधीश कोण? याकडे संपूर्ण खानापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. खानापूर तालुक्यात चौरंगी लढत झाली. तालुक्यातून 13 जणांनी ही निवडणूक लढवली आहे. आता उद्या दि 13 तारखेला दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल लागणार असून 13 पैकी कोण 12 जणांचे 12 वाजणार आहेत. अन् कोणा 13 व्या उमेदवाराच्या गळ्यात जनता विजयाची माळ घालणार, याकडे तालुक्याचे लक्ष वेधले आहे.
खानापूर तालुक्यात 13 उमेदवारांनी चुरशीने निवडणूक लढवली.यामध्ये प्रामुख्याने चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले होते. पण काही अपक्ष उमेदवारांनी यावेळी प्रचारात आघाडी घेतली होती. कोणातरी एकट्याचा विजय होणारच आहे. पण दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या पराभूत उमेदवाराला अपक्ष उमेदवारांच्या मतदानाचा किती फटका बसणार याकडे लक्ष लागले आहे. एकूणच खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विठ्ठल हलगेकर, काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर, निधर्मी जनता दलाचे उमेदवार नासिर बागवान व महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांच्यात चौरंगी लढत झाली आहे. या चौरंगी लढती बरोबर शिवसेनेचे उमेदवार के. पी. पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार इरफान तालिकोटी यांनीही कडवी लढत देण्यासाठी प्रचारात आघाडी घेतली. खरंतर चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले, पण काँग्रेसच्या विरोधात इरफान तालिकोटी यांनी घेत आघाडी घेऊन काँग्रेसचे मतदान विभाजन करण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेच्या नावावर निवडणूक लढवलेले श्रीमान के पी पाटील यांनीही प्रचारात एकेरी प्रयत्न केले. त्यामुळे या चौरंगी लढतीत इतर उमेदवार किती मते घेणार यामुळे विजयी व पराभूत उमेदवाराची आकडेमोड राहणार आहे. तर उर्वरित सात अपक्ष उमेदवार हे सगळे मिळून किती मते घेणार याकडेही लक्ष लागले आहे.
2018 च्या निवडणुकीतील माजी आमदार अरविंद पाटील वगळता चौरंगी लढत लागली आहे. माजी आमदार अरविंद पाटील यांनी समितीची काडीमोड करत भाजपात प्रवेश केल्यानंतर उमेदवारी न मिळाली तरी त्यांनी भाजपच्या पाठीशी ठाम राहून विठ्ठल हलगेकर यांना निवडून आणण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. त्यामुळे अरविंद पाटील यांचे मॅजिक भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बळ देणारे ठरेल का? याकडे लक्ष लागले आहे. भाजप उमेदवार श्री विठ्ठल हलगेकर यांनी मागील निवडणुकीत 31हजार मते घेतली होती. पण आता भाजपची ताकद व माजी आमदार अरविंद पाटील यांचे पाठबळ यामुळे भाजपा किती आघाडी घेणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे. तर इकडे काँग्रेसच्या विद्यमान आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनीही साम दाम, दंड लावून पुन्हा एकदा रिंगणात आघाडी घेतली आहे. तालुक्यातील महिला पुन्हा आपल्या पाठीशी राहतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. मागील निवडणुकीत 36 हजाराचा आकडा पार करत त्यांनी खानापूरचे तक्त जिंकले होते. विकासाच्या जोरावर त्यांनी जोरदार प्रचारात आघाडी घेतली. तर तिसरे उमेदवार नासिर बागवान यांनीही मागील पडलेल्या 28 हजार मतांची टक्केवारी वाढणार का? याकडे लक्ष आहे. यावेळी प्रारंभीपासून बागवान यांनी आपली हवा निर्माण करत काँग्रेसचीच अधिक मते मिळतील अशी चर्चा आहे. पण त्यांच्या पाठीशी राहिलेले मतदार काय मॅजिक करतील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे त्यांचे किती मताधिक्य राहणार यावर विजयी उमेदवाराचे गणित राहणार आहे. खानापूर तालुक्यात गेल्या 66 वर्षात महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमा लढ्याच्या व मराठी भाषेच्या संवर्धनाकडे राखत आलेला समितीचा गड पुन्हा अबाधित ठेवण्यासाठी राष्ट्रीय पक्षाच्या वळचणीला गेलेल्या मराठी भाषिक व युवा पिढी समितीच्या पाठीमागे राहतील का? हा प्रश्न आहेच. खानापूरच्या इतिहासात जेव्हा जेव्हा एकच उमेदवार राहिला तेव्हा विजय नक्कीच झाला आहे. ते मॅजिक काम करेल का? याकडे लक्ष लागले आहे.
मागील निवडणुकीत समितीचे उमेदवार विलास बेळगावकर यांनी 17 हजार मते घेतली होती. तर माजी आमदार अरविंद पाटील यांनीही समितीच्या नावे 26 हजार मते मिळवली होती. या दोन्ही मतांची आकडेवारी एकत्र केल्यात विजयाची नांदी नक्कीच! पण यावेळी अरविंद पाटील गटाने भाजपच्या पाठीशी ठाम निर्णय घेतला त्यामुळे समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील समितीची मते घेऊन मॅजिक करतील का, तसे झाल्यास समिती नक्कीच आघाडी घेणार, पण माजी आमदार अरविंद पाटील यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची मोट बांधून भाजपच्या पाठीशी ठाम राहिल्याने भाजपची मताची टक्केवारी वाढणार का? असे अनेक प्रश्न मतदारांच्या समोर उपस्थित राहिले आहेत. त्यामुळे उद्या होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.