बेळगाव : सध्या शाळांना सुट्टीचे दिवस. अनेक मुले कधी आजोळी तर कधी मामाच्या गावी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आहेत. पण अशाच परिस्थितीत सुट्टीच्या निमित्ताने आजोळीच्या गावी गेलेल्या एका बालिकेला विद्युत भारित स्पर्श झाल्याने जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी खानापूर रोड, मच्छे येथील नेहरू नगर परिसरात असलेल्या श्रीनिवास फॅक्टरीच्या शेजारी घडली आहे. या परिसरात वास्तवात असलेल्या बोंगाळे कुटुंबातील बालिकेला हेस्कॉमच्या गलथान कारभारामुळे जीव गमवावा लागला. दुर्दैवी मालिकेचे नाव मधुरा केशव मोरे (वय १३) असे आहे.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती अशी की, मूळ येळ्ळूर राजहंसगड येथे राहणारी आणि सध्या वडिलांच्या कामानिमित्त कोल्हापूर येथे स्थायिक असणारी मधुरा हि आपल्या आजोळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आली होती. खेळता खेळता मधुराचा हात हाय वोल्टेज केबलला लागला आणि पाहता क्षणीच ती उडून दुसऱ्या मजल्यावर पडली आणि जळून खाक झाली.
गेल्या २ वर्षांपासून सातत्याने हेस्कॉमकडे याबाबत तक्रार करूनही अधिकाऱ्यांच्या अक्षम्य दुर्लक्षमुळे आज एका मुलीला जीव गमावण्याची वेळ आली आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. सुट्टीत आजोळी आलेल्या चिमुरडीचा दुर्दैवी अंत झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.