बेळगाव लाईव्ह : गोव्यातील आधुनिक रस्ते कनेक्टिव्हिटीला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाची घोषणा केली.
बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 748 चे (अनमोड मार्गे) चौपदरीकरण केले जाणार आहे. या महामार्गाचा 52 किलोमीटर लांबीचा रस्ता चौपदरी केला जाणार आहे. त्यासाटी चार हजार कोटी रुपये निधी खर्च होणार आहे. शुक्रवारी गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ ते धारगळ्या सहापदरी रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्ग 152 किमी लांबीचा आहे. त्यातील 82 किमी रस्ता हा कर्नाटक हद्दीत आहे, तर उर्वरित 70 किमी रस्ता गोवा राज्यात आहे. पुणे-बेंगलोर महामार्गाला जोडणारा हा बेळगाव- पणजी महामार्ग गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत आहे. या महामार्गाचे कर्नाटक हद्दीतील चौपदरीकरण झाले आहे. पण ज्या ठिकाणी राखीव जंगल आहे, तेथे मात्र चौपदरीकरण झालेले नाही. 52 किमी लांबीच्या महामार्गाच चौपदरीकरण होणे बाकी आहे ते कामही आता पूर्ण केले जाणार आहे. या संपूर्ण महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर बेळगावहून गोव्याला जाण्यासाठीचा वेळ कमी होणार आहे. बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाबरोबरच गोव्यातील मडगाव येथून कर्नाटक हद्दीपर्यंत 45 किमी लांबीचा बायपास तयार केला जाणार आहे. त्यासाठी 3 हजार 500 कोटी निधी खर्च केला जाणार आहे. गडकरी यांनीच गोव्यातील कार्यक्रमातील भाषणावेळी ही माहिती दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनी बेळगाव ते पणजी या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणा केली असली लवकर काम पूर्ण व्हावे या रस्त्याची नितांत गरज आहे अशा भावना नेटकरी उपस्थित करताना दिसत आहेत.