हब्बहट्टी : खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागात जंगलात वावरणाऱ्या नागरिकांना अनेक वेळा जंगली हिस्त्र प्राण्यांची सामना करावा लागतो. आपण अनेक वेळा अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाल्याचे प्रकार पाहिले आहेत. अशाच प्रकारे शनिवारी सकाळच्या सुमारास खानापूर तालुक्यातील जांबोटी जवळील हब्बनहट्टी येथे गुरे चरावयास गेलेल्या एका महिलेवर झुडपात लपून बसलेल्या दोन अस्वलानी हल्ला केल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, हब्बनहट्टी येथील रेणुका इराप्पा नाईक (वय 60 वर्षे) ही महिला आज सकाळी आठ वाजता आपली गुरे घेऊन शेताकडे गेली होती नाल्याच्या ठिकाणी गेलेली जनावरे परत आणण्यासाठी गेली असता तेथे दबा धरून बसलेल्या दोन अस्वलांनी अचानक हल्ला चढविला. तिच्या कपाळाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी जखमी झालेल्या महिलेने आरडाओरडा करताच तिचा पती व इतर शेतकरी मदतीला धावून आले व लाठ्या काठ्या व दगडाने मारून अस्वलांना पिटाळून लावत महिलेला त्यांच्या तावडीतून बाजूला केले. रक्तबंबाळ झालेल्या जखमी महिलेला बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल ला दाखल करण्यात आले आहे. सदर जखमी महिलेला वन खात्याने नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.