IMG_20230516_201840

बेळगाव : जिल्ह्यातील 18 पैकी 6 मतदारसंघातील आमदारांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकून विधानसभेत प्रवेश करून राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

राजकीय सत्तेचे केंद्र म्हणून चित्रित झालेल्या बेळगाव जिल्ह्यात यावेळी काही प्रभावशाली लोकांचा पराभव झाला असून, त्याचा परिणाम म्हणून नव्या पिढीचे नेते निवडून आले आहेत.

उच्चांकी मतदाने हलगेकरांनी केला प्रवेश!

खानापूर मतदारसंघातून 2018 मध्ये काँग्रेसचे डॉ.अंजली निंबालकर यांच्या विरोधात पराभूत झालेले विठ्ठल हलगेकर यांनी यावेळी डॉ.अंजली निंबाळकर यांचा 54629 मताने पराभव केला. आम. विठल हलगेकर यांनी 91834 मते घेतली. तर डॉ. निंबाळकर यांनी 37,205 मते घेतली. आम. हलगेकर यांनी आतापर्यंतच्या खानापूर विधानसभेचे इतिहासात घेतलेले हे उच्चांकी मतदान म्हणावे लागेल. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातही विधान परिषदेत पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्या आमदारांमध्ये अधिक मतांनी विजयी झालेले आमदार आहेत. आमदार हलगेकर यांनी महालक्ष्मी ग्रुप तसेच लैला साखर कारखान्याच्या माध्यमातून शैक्षणिक व सहकारी संस्थेची असलेल्या अनुभवाचा त्यांनी लाभ उठवत भाजपकडून दुसऱ्यांदा उमेदवारी मिळवली. व विजयाची माळ गळ्यात घातली. यावेळी खानापूर तालुक्यात भाजपने न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने विजय संपादन केला आहे.

कित्तूर् मतदारसंघात प्रस्थापितांना धक्का!

कित्तूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले बाबासाहेब पाटील यांनी 77536 मते घेऊन विधानसभेत प्रवेश केला आहे. गेल्या वेळी काँग्रेसचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी बिगरपक्षीय म्हणून निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. यावेळी त्यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले आणि त्यांनी भाजपचे उमेदवार महांतेश दोड्डगौडर (74543 मते) यांच्याविरुद्ध 2993 मतांनी विजय मिळवला.

कत्ती घराण्याने राखला हुक्केरीचा वारसा!

हुक्केरी मतदार संघातून स्वर्गीय माजी मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनानंतर भाजपाने निखिल कत्ती यांना भाजपने उमेदवारी दिली. यामध्ये निखिल कत्ती यांनी 1,03,500 मते घेऊन यश संपादन केले आहे त्यांच्या विरोधात बसलेले काँग्रेसचे माजी मंत्री के बी पाटील यांना 61013 मते मिळाली. आम. निखिल यांनी पहिल्या निवडणुकीत माजी मंत्री ए. बी. पाटील यांचा 42489 मतांनी पराभव करून विधानसभेत प्रवेश मिळवला आहे. एक जिल्हा पंचायत सदस्य म्हणून काम केलेल्या निखिलने वडिलांच्या राजकारणाची पताका कायम राखली आहे.

सौंदत्तीचा गड राखण्यात मामणी घराणे अपयशी

सौंदत्ती मतदारसंघातील भाजपचे आमदार आनंद मामणी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती यांना भाजपने उमेदवारी दिली. गेल्या वेळी काँग्रेसचे भाजपचे उमेदवार आनंद मामणी यांच्याकडून पराभूत झालेले विश्वास वैद्य यांनी यावेळी 71224 मते मिळवली. रत्ना मामणी यांनी 56,529 मते मिळवली यामध्ये आम. वैद्य हे 14,695 ​​मतांच्या फरकाने विजयी झाले, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या प्रयत्नात पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला.

उत्तरात सेठ घराण्याचे उत्तर :

2018 च्या निवडणुकीत बेळगाव उत्तर मतदारसंघातून पराभूत झालेले फिरोज सेठ यांनी यावेळी त्यांचा भाऊ आसिफ (राजू) सेठ यांना विजयी करून विधानसभेत पाठवले आहे. यावेळी फिरोज सेठ यांच्याऐवजी काँग्रेसने राजू सेठ यांना उमेदवारी दिली. यामध्ये राजू शेठ यांनी 68863 मते मिळवली तर भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांना 64,312 मते मिळाली. आमदार राजू शेठ हे 4,551 मतांनी विजयी झाले. व त्यांनी पहिल्यांदाच विधान सभेत प्रवेश केला आहे.

पी. राजीव कडून हिसकावला महेंद्रने गड!

जिल्ह्यातील कुडची मतदारसंघात भाजपचे पी. राजीव विरुद्ध यांच्याविरुद्ध काँग्रेसचे उमेदवार महेंद्र तमन्नावर यांच्यात लढत झाली. यावेळी कुडची मतदारसंघातून काँग्रेसचे महेंद्र यांना मतदारांनी कौल दिला आहे. मागीलवेळी महेंद्र हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उभे होते पण आता काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेऊन आमदार महेंद्र तमन्नावर यांनी विधानसभेत पहिल्यांदा प्रवेश केला. व कुडचीच्या राजकारणात बदल घडवला.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us