Home » न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी विवेक गिरींचा एल्गार!

न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी विवेक गिरींचा एल्गार!

file_000000009bd081f584b912c84ca5bddb

न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी विवेक गिरींचा एल्गार!

खानापूर नगरपंचायतीसमोर १६ सप्टेंबरपासून आमरण अन्नत्याग उपोषण

खानापूर, दि. १५ सप्टेंबर :
खानापूर नगरपंचायतीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तसेच बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन केले नसल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विवेक गिरी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित बांधकामावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ पासून खानापूर नगरपंचायतीसमोर आमरण अन्नत्याग उपोषण करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

खानापूर शहरातील समादेवी गल्ली परिसरात तीगडीमठ यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासंदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने बांधकाम करताना न्यायालयासमोर देण्यात आलेल्या संमतीपत्रातील अटी तसेच बांधकाम परवानगीमध्ये नमूद केलेल्या नकाशानुसारच काम करण्याचे आदेश दिले असल्याचा दावा विवेक गिरी यांनी केला आहे. मात्र, प्रत्यक्षात त्यानुसार बांधकाम होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

गिरी यांनी सांगितले की, या प्रकरणी त्यांनी १ सप्टेंबरपासून नगरपंचायतीकडे पाठपुरावा सुरू केला असून, ३ सप्टेंबर रोजी लेखी तक्रारही दाखल केली होती. मात्र, नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कारवाई झाली नसल्याने त्यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे लेखी तक्रार केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत संबंधित बांधकामाबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश नगरपंचायतीला दिल्याचे गिरी यांनी सांगितले. मात्र, नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी बांधकामस्थळी जाऊन केवळ मोजमाप केले असून, त्यापुढे ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे संबंधितांकडून बांधकाम सुरू ठेवून स्लॅबचे काम पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उच्च न्यायालयाचा आदेश आणि जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांची अंमलबजावणी झाली नसल्याने नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, असे गिरी यांनी सांगितले. तसेच नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना बांधकामासाठी सहकार्य केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून न्यायालयीन आदेशाची व जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांची तातडीने अंमलबजावणी करावी, संबंधित बांधकामाबाबत कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी आपले अन्नत्याग उपोषण सुरू राहणार असल्याचे विवेक गिरी यांनी स्पष्ट केले.

Do Share
error: Content is protected !!
Call Us