- मराठीच्या हक्कासाठी लढणाऱ्या लढवय्यांचा सत्कार
- मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने गणपती बावकर, मोहन पाटील यांचा गौरव
खानापूर : मराठी माध्यमाच्या शिक्षक पदांसाठी सातत्याने पाठपुरावा करून मराठीच्या हक्कासाठी आवाज उठविणाऱ्या डी.एड.धारक गणपती बावकर (खैरवाड) आणि मोहन पाटील (मणतुर्गा) यांचा मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला.
प्राथमिक शिक्षक भरती प्रक्रियेत मराठी माध्यमातील रिक्त जागांकडे दुर्लक्ष होत असल्याने बावकर व पाटील यांनी संघटितपणे शासनाकडे पाठपुरावा केला. संबंधित मंत्री, सचिव तसेच अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन निवेदने सादर करत मराठी माध्यमातील शिक्षकांच्या जागा भरण्याची मागणी त्यांनी लावून धरली. त्यांच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून मराठी माध्यमासाठी २०० शिक्षक पदे मंजूर करण्याची शासनाकडून हमी देण्यात आली आहे.
तसेच उर्दू माध्यमासाठी ८०० शिक्षक पदे मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भातील प्रस्ताव शिक्षण विभागाकडून संबंधित खात्याकडे पाठविण्यात आला असून शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर शिक्षक भरतीची अधिसूचना जारी होण्याची अपेक्षा आहे.
या पार्श्वभूमीवर मराठीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या दोन्ही शिक्षकांचा मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, खजिनदार ईश्वर बोबाटे, ऋतिक कुंभार, वासुदेव चौगुले, दत्ता गावडे, गजानन बेळगावकर, बाबाजी पाटील, हनुमंत सुतार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पत्रकार पिराजी कुराडे यांनी केले.
“मराठी माध्यमाच्या हक्कासाठी पाठपुरावा सुरूच राहील”
“आम्हाला ३०० ते ८०० जागांची अपेक्षा होती. तरीही सरकारने मराठी माध्यमासाठी २०० जागा मंजूर करण्याची हमी दिली आहे. अधिसूचना जारी झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे डी.एड. पात्र उमेदवारांनी आतापासूनच सीईटी परीक्षेची जोरदार तयारी करावी,” असे गणपती बावकर यांनी सांगितले.तसेच या प्रयत्नासाठी तालुक्याचे आमदार, काही ज्येष्ठ शिक्षक तज्ञ, अधिवक्ते व राजकीय मंडळी तथा पत्रकारानी सहकार्य केले त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असेच मराठी शिक्षणाच्या हक्कासाठी सर्वांची सहकाराची अपेक्षा व्यक्त केली.
मराठी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर होण्याबरोबरच पात्र डी.एड.धारकांना रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता आहे. बावकर आणि पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे व मराठीच्या हक्कासाठी केलेल्या लढ्याचे तालुक्यातून कौतुक होत आहे.