देशसेवेत रमलेल्या वीरांच्या मनगटावर ताराराणीच्या लेकींच्या रेशीम धाग्यांची साक्ष
म.मं. ताराराणी महाविद्यालयात देशभक्तीमय वातावरणात रक्षाबंधन सोहळा उत्साहात
खानापूर : देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या वीर आजी-माजी सैनिकांच्या मनगटावर राखी बांधून म.मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात रक्षाबंधनाचा सोहळा अत्यंत भावूक, देशभक्तीमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. खानापूर परिसरातील बहुसंख्य माजी सैनिक या सोहळ्यास उपस्थित होते.
‘रेशमाच्या धाग्यांनी जोडले आहे हे नाते, ज्याचे मोल जगातील कोणत्याही गोष्टीने होऊ शकत नाही’ आणि ‘भाऊ-बहिणीच्या प्रेमासोबत रक्षणाच्या विश्वासाचे पर्व’ या उदात्त भावनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मागील काही वर्षांपासून मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई यांच्या मार्गदर्शनाखाली वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या उपक्रमाला मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या ‘जय हिंद’ घोषणेला नवी ताकद मिळाली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविकात प्रा. पी. व्ही. कर्लेकर यांनी रक्षाबंधनाचा पौराणिक इतिहास सांगितला. सैनिक हा केवळ गणवेशातील व्यक्ती नसून देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारा राष्ट्रसेवक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रा. टी. आर. जाधव यांनी कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांचे शौर्य, त्याग आणि बलिदानावर प्रकाश टाकत उपस्थित वीर जवानांना मानवंदना दिली.
वीर जवानांच्या मनगटावर राखी
सोहळ्याच्या मुख्य टप्प्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उपस्थित देशवीरांच्या मनगटावर राखी बांधून त्यांच्याप्रति आदर, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त केला. कॉलेज जी.एस. कुमारी वैशाली गुरव यांच्यासह आफरीन सनदी, सुहाना नालबंद, जोया सनदी, अन्वेषा माने, पलक मकानदार आणि सोनी केरकर यांनी सैनिकांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
महाविद्यालयातील महिला प्राध्यापकांनी पुरुष प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना राखी बांधून बंधुभावाचा संदेश दिला. सीमावर्ती भागात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या रक्षाबंधनाच्या विविध पैलूंची माहितीही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
‘देशसेवेपेक्षा मोठा कोणताही सन्मान नाही’
माजी सैनिक संघटनेचे संचालक सुभेदार एन. बी. झुंजवाडकर म्हणाले, “देशसेवेपेक्षा मोठा कोणताही सन्मान नाही. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाला बहीण राखी बांधते, तेव्हा तो केवळ रेशीम धागा नसून संपूर्ण देशाचा विश्वास असतो. युवक-युवतींनी या पवित्र धाग्याचे मर्म ओळखून भारतीय सैन्यात भरती व्हावे.”
माजी सैनिक संघटनेचे कार्याध्यक्ष व मनसे अध्यक्ष सुभेदार गोपाळराव देसाई यांनी रक्षाबंधन हे केवळ धाग्यापुरते मर्यादित नसून रक्षणाच्या प्रतिज्ञेशी जोडलेले असल्याचे सांगितले. कारगिल युद्ध तसेच अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील ऑपरेशन ब्लू स्टारच्या प्रत्यक्ष अनुभवांचा उल्लेख करत सैनिकांचे जीवन म्हणजे देशासाठी घेतलेली अखंड प्रतिज्ञा असल्याचे त्यांनी सांगितले.
‘सैनिकांच्या त्यागाचा सन्मान करणे हीच खरी रक्षाबंधनाची भावना’
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य अरविंद एल. पाटील यांनी आपला भावूक अनुभव सांगितला. १९९८ मध्ये भारतीय सैन्यात ‘एज्युकेशनल हवालदार’ म्हणून त्यांची निवड झाली होती. मात्र आईच्या इच्छेमुळे ते सैन्यात रुजू होऊ शकले नाहीत. त्यानंतर १९९९ मध्ये केंद्रीय विद्यालयात इंग्रजी शिक्षक पदाची मुलाखत उत्तीर्ण झाल्यानंतर कारगिल युद्धात शहीद झालेल्या केरळमधील एका सैनिकाच्या मुलाप्रती आदर व्यक्त करत त्यांनी ती संधी स्वेच्छेने सोडल्याचे सांगितले.
“देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना राखी बांधणे आणि त्यांच्या रक्षणाच्या व त्यागाच्या भावनेचे चीज करणे, हीच खरी रक्षाबंधनाची भावना आहे,” असे प्राचार्य पाटील यांनी सांगितले.
माजी सैनिकांची उपस्थिती
यावेळी माजी सैनिक संघटना खानापूरचे सुभेदार प्रकाश गवसेकर (उपाध्यक्ष), नायब सुभेदार देवप्पा पाटील, नायब सुभेदार संतन शावेज बारगज, हवालदार गणपत पाटील, हवालदार राजाराम देवलतकर, हवालदार महादेव तिरवीर, हवालदार मनोहर लक्ष्मण हट्टीकर आणि हवालदार संदीप अंधारे उपस्थित होते.
महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक एन. ए. पाटील, प्रा. मंगल देसाई, सुनीता कणबरकर, आर. व्ही. मरीत्तमण्णावर, वनिता गावडे, नितीन देसाई, प्रशांत पाखरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी चित्रा अर्जूनवाडकर, आर. पी. धबाले, सीमा पाटील, सातेरी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके व प्रभावी सूत्रसंचालन प्रा. जयश्री शिवणकर यांनी केले.