खानापूर : प्रतिनिधी
महिलांच्या विकासासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या तारांगण-ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठान, खानापूर तसेच करंबळ ग्रामस्थांच्या वतीने रविवार, दि. २० जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा, करंबळ येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, हाडांचे विकार, हृदयरोग, दंत तपासणी, नेत्र तपासणी, स्त्रीरोग तपासणी तसेच लहान मुलांची तपासणी करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी बेळगाव येथील सेंट्रल केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, श्री ऑर्थो अँड ट्रॉमा केअर सेंटर, एम. एम. जोशी कोडकिणी आय सेंटर, वन डेंटल, गिझरे मॅटर्निटी हॉस्पिटल आदी नामांकित रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार असून, ते रुग्णांची तपासणी करून आवश्यक सल्ला व मार्गदर्शन करणार आहेत.
शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सदानंद मासेकर, करंबळ हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल कदम आणि सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुधा जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते होणार असून, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विठ्ठल होसूर आणि खजिनदार सुभाष धबाले यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी परिसरातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.