खानापूर लाईव्ह | संपादक : पिराजी कुऱ्हाडे
खानापूर, प्रतिनिधी : यंदा मृग नक्षत्राने शेतकऱ्यांना चांगलीच हुलकावणी दिल्याने खानापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या सरींवर विश्वास ठेवून अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणी तसेच रोपवाटिकांसाठी बियाणे पेरले होते. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
पहिल्या पावसाच्या आधारे पेरण्यात आलेले भात बियाणे आता उगवणीनंतर कोमेजण्याच्या स्थितीत आले आहे. अनेक ठिकाणी रोपवाटिकांतील भात रोपे पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असून, शेतकरी बोरवेल व पंपसेटच्या सहाय्याने रोपे वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र सर्वच शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार 23 जूननंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी प्रत्यक्षात समाधानकारक पाऊस केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. आगामी काही दिवसांत चांगला पाऊस न झाल्यास अनेक भागांत दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
खानापूर तालुक्यात भात हे प्रमुख पीक असून, बहुतांश शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाच्या अनियमिततेचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होणार आहे. आधीच वाढलेले बियाणे, खत आणि मशागतीचे खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना दुबार पेरणीची वेळ आल्यास त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून, आद्रा नक्षत्रात तरी पाऊस दमदार हजेरी लावून शेतीला दिलासा देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाची चिंता दिवसेंदिवस वाढत असून, लवकरात लवकर समाधानकारक पाऊस पडावा अशी प्रार्थना सर्वत्र व्यक्त होत आहे.
“पाऊस लांबल्यास दुबार पेरणी अटळ; शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या” अशीच चर्चा सध्या खानापूर तालुक्यात ऐकू येत आहे.