IMG-20260603-WA0017


खानापूर, ता. ३ : तालुका गॅरंटी योजनांची मासिक आढावा बैठक बुधवारी (ता. ३) तालुका पंचायत सभागृहात उत्साहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका गॅरंटी योजना समितीचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. योजनेचे कार्यदर्शी रमेश मेत्री उपस्थित होते. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपस्थितांचे स्वागत व मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन व्यवस्थापक श्रीकांत सपटला यांनी केले.
यावेळी अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी म्हणाले की, तालुक्यात गॅरंटी योजनांच्या नियमित बैठका होत असून बेळगाव जिल्ह्यात समितीच्या कार्याचे कौतुक होत आहे. गॅरंटी योजनांद्वारे तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
बससेवेसंदर्भात सूचना
खानापूर बस डेपोचे व्यवस्थापक संतोष बेनकणकोप यांनी माहिती देताना सांगितले की, मे २०२६ महिन्यात एकूण ९ लाख ६३ हजार ३३२ प्रवाशांनी प्रवास केला असून डेपोला ३ कोटी ४३ लाख ९९ हजार ९९० रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. महिलांसाठीच्या ‘शक्ती’ योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला जात असून मे महिन्यात ६ लाख ३७ हजार १३३ महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला.
तसेच डेपोमध्ये १४ चालक व वाहकांची कमतरता असल्याने बससेवा सुरळीत ठेवण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीत इदलहोंड, सागिनकोप, माळअंकले, बिडी-कित्तूर तसेच पाली-हेमडगा मार्गांवर बससेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बससेवा नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गृहलक्ष्मी योजनेत ६४ हजारांहून अधिक लाभार्थी
गृहलक्ष्मी योजनेबाबत सहाय्यक सीडीपीओ शारदा मराठे यांनी माहिती देताना सांगितले की, मे २०२६ अखेरपर्यंत ६७,३६० अर्जांची नोंदणी झाली असून त्यापैकी ६४,३११ लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे. केवळ २५ प्रकरणे प्रलंबित असून २१४ प्रकरणांमध्ये तांत्रिक अडचणी आढळल्या आहेत.
शिधापत्रिका विभागाच्या आकडेवारीनुसार १,७६८ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ९८६ मंजूर, ४२० नामंजूर तर ३६२ अर्ज प्रलंबित आहेत. तालुक्यात सक्रिय रेशनकार्डांची संख्या ८३,६७३ असल्याची माहिती देण्यात आली.
युवा निधी योजनेबाबत जनजागृतीची गरज..
युवा निधी योजनेबाबत अधिकारी गुरू हिरेमठ यांनी माहिती दिली. उच्च शिक्षण किंवा नोकरी लागल्यानंतर या योजनेचा लाभ बंद होतो. ही योजना केवळ दोन वर्षांसाठी असून लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी किमान सहा वर्षे कर्नाटकात शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे. सध्या १३० युवकांचे अर्ज प्रलंबित असून गावागावांत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
रेशन वितरणातील त्रुटींवर संताप..
समिती सदस्य प्रकाश मादार यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली. नवीन रेशनकार्ड, मृत व्यक्तींची नावे, धान्यसाठा आणि पुरवठा याबाबत योग्य माहिती मिळत नसल्याने शासनाचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
अन्नभाग्य योजनेबाबत अन्न निरीक्षक उदय खातेदार यांनी माहिती दिली. यावेळी सदस्य दीपा पाटील यांनी काही ठिकाणी ५० किलो धान्यात ३ किलो कमी मिळत असल्याची तक्रार केली. तसेच लाभार्थ्यांचे दोन वेळा अंगठे घेतले जात असल्याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला.
यावर कार्यदर्शी रमेश मेत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून आवश्यक माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या. रेशन वितरणातील त्रुटी व काळाबाजाराच्या तक्रारींबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गृहज्योती योजनेचा ९८.४ टक्के लाभ..
गृहज्योती योजनेची माहिती देताना प्रवीण बारगाले यांनी सांगितले की, तालुक्यातील ९८.४ टक्के नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत. मुसळधार पावसामुळे खराब झालेले वीजखांब बदलण्याचे काम सुरू आहे. हलशी उपकेंद्रासाठी नवीन कंत्राटदार नियुक्त करण्यात येणार असून बैलूर उपकेंद्राच्या कामाबाबतही पाठपुरावा करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
बैठकीस समिती सदस्य प्रकाश मादार, बाबू हत्तरवाड, इसाखान पठाण, जगदीश पाटील, रुद्राप्पा पाटील, गोविंद पाटील, युसुफ हरगी, प्रियांका गावकर, दीपा पाटील, शांताराम गुरव, राजा कुडाळे, विवेक तडकोड, संजय गावडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us