खानापूर, दि. ३० (प्रतिनिधी) : मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या खानापूर शहरात अनेक वर्षांपासून सरकारी मराठी माध्यम हायस्कूलची मागणी होत होती. विविध संघटना, मराठीप्रेमी नागरिक तसेच लोकप्रतिनिधींमार्फत वेळोवेळी ही मागणी शासनाकडे करण्यात आली होती. अखेर या मागणीला यश आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यम हायस्कूल सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि मराठीप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
खानापूर येथील सरकारी कन्नड माध्यम हायस्कूलमध्येच मराठी माध्यम विभाग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयासाठी आमदार विठ्ठल हलगेकर तसेच गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांनी विशेष प्रयत्न केल्याचे समजते. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी प्रत्यक्षात साकार झाली आहे.
यापूर्वी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आठवी, नववी आणि दहावीच्या शिक्षणासाठी खासगी शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागत होता. खासगी शाळांची फी, वह्या-पुस्तके, गणवेश व इतर खर्चामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडत होता. अनेक होतकरू विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.
सरकारी मराठी माध्यम हायस्कूल सुरू झाल्यामुळे आता गरीब, होतकरू आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. खानापूर शहरासह परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे.
गटशिक्षणाधिकारी पी. रामाप्पा यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, “यावर्षीपासून मराठी माध्यम हायस्कूल सुरू होत आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. पालकांनी आपल्या पाल्यांना प्रवेश देऊन मराठी माध्यमातील शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास भविष्यात अधिक सक्षम व आदर्श मराठी माध्यम हायस्कूल उभारणे शक्य होईल.”
मराठी भाषिक बहुल असलेल्या खानापूर शहरात सरकारी मराठी माध्यम हायस्कूलची झालेली सुरुवात ही मराठी शिक्षणाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.