खानापूर, दि. १५ :
“बेळगाव सीमाभागाशी माझ्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहतील,” अशी ग्वाही तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित आर. आर. आबा पाटील यांनी येथे दिली. नागुर्डावाडा येथे राबविण्यात आलेला “मंदिर तेथे वाचनालय” हा अभिनव उपक्रम संपूर्ण राज्यासाठी आदर्शवत असून, स्वतःच्या मतदारसंघातही प्रत्येक मंदिर उभारणीसोबत वाचनालय सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा महत्त्वाचा संकल्प त्यांनी यावेळी सोडला.
ते नागुर्डावाडा येथे आयोजित श्री नागेश महारूद्र मंदिराच्या भव्य जीर्णोद्धार आणि उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदिर समितीचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई होते.
प्रवेशद्वार आणि गाभाऱ्याचे दिमाखदार उद्घाटन
सोहळ्याची सुरुवात मंदिराच्या भव्य प्रवेशद्वाराच्या उद्घाटनाने झाली. हे उद्घाटन आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते पार पडले. यानंतर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याचे उद्घाटन आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी केले. याच कार्यक्रमात “मंदिर तेथे वाचनालय” या विशेष उपक्रमाचा रीतसर शुभारंभ मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी आष्टेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाचा विधी शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाला.
सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक: आमदार हलगेकर
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी, ग्रामदैवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार हा संपूर्ण गावाच्या सांस्कृतिक ऐक्याचा आणि धार्मिक सलोख्याचा खरा प्रतीक आहे. तिन्ही गावांचे ग्रामदैवत हे तालुक्यात एक आदर्श वंत दैवत व नवसाला पावणारे दैवत म्हणून ओळखले जाते त्यामुळे या दैवतानेच या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला बळ दिलं आहे. स्वर्गीय उदयसिंग सरदेसाई यांची प्रेरणा आणि त्यांची या भागावर असलेली मर्जी याची साक्ष या ठिकाणी उपस्थित असलेली भक्तिमय जनताच असल्याचे मत व्यक्त केले.
मंदिर तेथे वाचनालय.. वैचारिक विकासाची पेरणी! वासुदेव चौगुले
“मंदिर तिथे वाचनालय” ही संकल्पना ग्रामीण भागाच्या शैक्षणिक आणि वैचारिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असून आदर्श तालुक्याने हा उपक्रम आत्मसात करावा, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते तथा दैनिक पुढारीचे पत्रकार वासुदेव चौगुले यांनी केले.
ते नागुर्डा वाडा परिसरात आयोजित वाचनालय उपक्रमाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी स्व. उदयसिंग दत्ताजीराव सरदेसाई यांच्या अनुपस्थितीची खंत व्यक्त केली. दूरदृष्टी, अभ्यासू वृत्ती आणि उच्च विचारसरणी असलेले नेतृत्व म्हणून उदयसिंगराव यांनी समाजहितासाठी संपूर्ण जीवन समर्पित केले होते. शिक्षणाची आस आणि या भागाचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे ध्येय होते, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
मान्यवरांची मांदियाळी
या ऐतिहासिक सोहळ्याला सीमाभागातील दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये प्रामुख्याने:
- माजी आमदार दिगंबर पाटील
- माजी आमदार अरविंद पाटील
- मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे, माजी महापौर मालोजी अष्टेकर.
- श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर
- खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई
- सरचिटणीस आबासाहेब दळवी, काँग्रेस अध्यक्ष ईश्वर घाडी, भाजप युवा नेते पंडित ओगले, भूविकास बँकेचे चेअरमन अमृत शेलार, भाजप नेत्या धनश्री सरदेसाई, माजी जिल्हा पंचायत सदस्य जयराम देसाई, नारायण कार्वेकर, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, सौ लक्ष्मी गोपाळ पाटील,, बाळासाहेब शेलार, नारायण कापोलकर, प्रसाद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात अन्य मान्यवरांनीही आपली समयोचित मनोगते व्यक्त केली.
भाविकांची अलोट गर्दी व महाप्रसाद
या सोहळ्यासाठी नागुर्डा, नागुर्डावाडी व विश्रांतवाडी परिसरातील नागरिकांसह अनेक राजकीय कार्यकर्ते आणि भाविकांनी अलोट गर्दी केली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत ज्ञानेश्वर पाटील यांनी केले. मुख्य कार्यक्रमानंतर आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाप्रसादाने या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता झाली.