oplus_2098176

oplus_2098176

oplus_2098176

खानापूर : पोरांच्या डोळ्यात उद्याचे स्वप्न नसणं, हे सर्वात वाईट आहे. ही स्वप्न दाखविण्याचे काम शिक्षण करते. ज्ञान अनुभवाने लाभते, असे ज्ञानेश्वरांनी सांगितले आहे. त्यातही मातृभाषेतून शिक्षण झाले पाहिजे. कारण, गुलामगिरी रोखण्यासाठी मातृभाषेतील शिक्षण अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन इस्लामपूरचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी केले.

येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि राज्य मराठी भाषा विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते.

पुढे बोलतांना डॉ. कुंभार म्हणाले, राबणारी माणसं संपली की, भाषा नष्ट होते. कामगार-कष्टकऱ्यांनी भाषेची निर्मिती केली आहे. निर्मिती केल्याशिवाय भाषा तयार होत नाही. मुलाला बोलायला शिकवते, म्हणून तिला मातृभाषा असते. मातृभाषेचा बुध्दीमत्तेशी संबंध आहे. भावना संपल्या की माणूस जनावर बनतो. शिक्षणामुळे माणसातील पशुत्व संपते. जगात अनेक देशांचा धर्म ख्रिश्चन असला तरी ती राष्ट्रे वेगवेगळी आहेत, कारण त्यांची निर्मिती भाषेवर अधारित झालेली आहे. ती सगळी राष्ट्रे त्यांच्या भाषेत व्यवहार करतात, म्हणून ते देश पुढारलेले आहेत.

oplus_4195328

देशातील ९४ टक्के शास्त्रज्ञ हे त्यांच्या मातृभाषेतून शिकले आहेत. इंग्रजी ही जगात जास्त बोलली जाणारी भाषा नाही, तरीही आपल्या देशात इंग्रजीचा अट्टाहास धरला जातो. मातृभाषेतून आत्मविश्वास वाढतो. त्या उलट परकीय भाषेतून शिक्षण घेतल्यास मुलांमध्ये न्युनगंड निर्माण होतो. मातृभाषेतील कवितांनीच क्रांती केली आहे. अनेकांना आत्महत्तेपासून परावृत्त केले आहे. याचा विचार करून आपण आपल्यांना मातृभाषेतून शिकविण्याची गरज आहे, असे मत डॉ. कुंभार यांनी मांडले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राने मराठीकडे केलेले दुर्लक्ष पाहता येत्या काळात मराठी शोधण्यासाठी महाराष्ट्राला सीमाभागात यावे लागेल, अशी खंत व्यक्त करतांनाच प्रतिष्ठानने गेल्या वर्षभरापासून चालविलेल्या कामाचे कौतूक केले.

यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील, श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, लेला शुगर्सचे व्यवस्थापकीय संचालक सदानंद पाटील, म.स.समिती कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, भाजप नेते प्रमोद कोचेरी, वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी आदींनी विचार मांडले. आगामी काळातही प्रतिष्ठान मराठीच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या कार्यात नवनव्या उपक्रमांसह कार्यरत राहील, अशी ग्वाही अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी दिली. प्रसंगी शिक्षक शिवाजी हसणेकर (उचवडे), माजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील (गर्लगुंजी) यांचा त्यांच्या क्षेत्रातील कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात प्रज्ञाशोध सामान्यज्ञान परीक्षेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारीतोषिकांचे वितरण करण्यात आले. ताराराणी हायस्कुलच्या विद्यार्थीनीनी यावेळी मराठी अभिमान गित व नृत्य सादर केले. कार्यक्रमाला खानापूर को-ऑप बंकेचे चेअरमन अमृत शेलार, भाजप नेते संजय कुबल, माजी जि.पं.सदस्य जयराम देसाई, सामाजिक कार्यकर्ते यशवंत बिर्जे, तज्ज्ञ समिती सदस्य प्रकाश चव्हाण, गर्लगुंजी कृषी पत्तीन संघाचे माजी अध्यक्ष राजू सिध्दाणी, तालुका विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील, प्रा. डॉ. आय. एम. गुरव, ताराराणीचे मुख्याध्यापक राहूल जाधव, निवृत्त शिक्षक संघटनेचे डी.एम.भोसले, अनंत पाटील, मिलाग्रीज चर्च शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष दीपक कोडचवाडकर आदींसह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला सहसचिव प्रल्हाद मादार यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन सचिव वासुदेव चौगुले तर आभार प्रदर्शन खजिनदार ईश्वर बोबाटे यांनी केले.

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us