खानापूर लाईव्ह न्युज /प्रतिनिधी : मातृभाषेतील शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या आकलन व सामान्य ज्ञानाची भर पडावी यासाठी दरवर्षी खानापुरातील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम कौतुकास्पद आहेत सीमा भागात मराठीची जपवणूक व मराठी भाषेला प्रबळ बनवण्यासाठी व आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये मराठी टिकवण्यासाठी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानने गेल्या अकरा वर्षापासून वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन समाजात एक ठसा उमटवला आहे. आज प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा घेऊन त्यांच्या विचारसरणीत भर टाकण्याचा कौतुकास्पद कार्य या प्रतिष्ठाने हाती घेतले आहे. आजच्या या स्पर्धात्मक परीक्षेच्या युगात विद्यार्थ्यांना अशा परीक्षा घेऊन प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे आणि ते काम मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान करत असल्याचे गौरव उद्गार खानापुरातील को-ऑप बँकेचे चेअरमन अमृत शेलार यांनी व्यक्त केले. आज रविवारी खानापूर येथील ताराराणी हायस्कूलमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे सामान्य ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा पार पडली. या परीक्षेमध्ये जवळपास 800 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सकाळपासून या परीक्षेमध्ये सहभाग घेण्यासाठी 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. शिवाय नोंदणी बाह्य विद्यार्थी दुपटीने सहभागी झाले होते. त्यामुळे परीक्षा सुरू करण्यासाठी वेळ झाला. मात्र सुरळीत पार पाडण्यात आली.

या वेळी झालेल्या कार्यक्रमात दीप प्रज्वलन खानापूर को-ऑप बँकेचे चेअरमन अमृत शेलार, भूविकास बँकेचे माजी संचालक के एम घाडी, गणेबैल हायस्कूलचे मुख्याध्यापक जी एम पाटील लोकोळी, हायस्कूलचे मुख्याध्यापक यळुरकर, तीवोली हायस्कूलचे सहशिक्षक रा.गी. पाटील पत्रकार पिराजी कुऱ्हाडे आदींचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर के एम पाटील, रा. गी. पाटील, पत्रकार पिराजी कुऱ्हाडे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सूत्रसंचालन प्रल्हाद मादार यांनी तर ईश्वर बोभाटे यांनी आभार मानले. सदर परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मराठा मंडळ संचालित ताराराणी हायस्कूलच्या संस्थापिका श्रीमती राजश्री नागराजू शाळेचे मुख्याध्यापक व विश्वस्त मंडळाचे यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने आभार व्यक्त करत दरवर्षी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने या स्पर्धा भरून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम आपण करत आहोत यासाठी आपली प्रतिष्ठान ची टीम नेहमी काळाने तत्पर आहे. यासाठी तालुक्यातील अनेक मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे सहकार्य वेळोवेळी लाभत आहे त्या सर्वांचे आपण ऋणी असल्याचे विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी मांडले.
मराठी भाषादिनी परीक्षेचा निकाल:
या सामान्य ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये 800 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्राथमिक व माध्यमिक विभागातील खेड्यापाड्यातून अनेक विद्यार्थी उत्स्फूर्त पणे सहभागी झाले होते. या परीक्षेमध्ये अधिक गुणांक घेऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना इतिहास 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भाषा दिन कार्यक्रमात त्यांना बक्षिसे देऊन गौरविले जाणार आहे.
