प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे जन्मतःच गुण नसतो. मात्र शतविने भविष्य लिहून ठेवले जाते असे म्हटले जाते. बुद्धिमत्तेची व समाजकार्याची नाळ असलेल्या घराण्यातील अनेक व्यक्ती भविष्यात घडत असतात. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते. अशाच उक्तीप्रमाणे लहानपणापासून खेळात,शैक्षणिक कार्यात स्वतःला झोकून ठसा उमटत समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या ध्येयापोटी झगडत, संघर्ष करत शिक्षणाची व ज्ञानार्जनाचा ध्यास मनी बाळगून जगणारी माणसे कमी असतात. शिक्षणानंतर कमवते झालो, संसार फुलला म्हणून कमकुवत न राहता समाजासाठी झटणारी माणसे कमीच. अशातच उभ्या आयुष्यामध्ये शिक्षणाचे धडे देता देता उत्तुंग भरारी गाठत एक हाडाचे शिक्षक व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून समाजात वेगळीच छाप टाकली आणि अनेक पुरस्कारांचे मानकरी बनले. शिक्षक ते मुख्याध्यापक पर्यंत गरुड झेप घेता घेता दिल्लीच्या तक्तापर्यंत पोहोचून दिल्लीच्या गादीतील राष्ट्रपती पदकाच्या मानकरी मिळवण्याची तालुक्यात पहिली ताकत निर्माण करणारे श्री आबासाहेब दळवी म्हटलं तर वावगे ठरणार नाही, अशा या दृढनिश्चयी तथा चळवळीतल्या शिक्षकाचा आज 30 जुलै हा जन्मदिन आहे. या जन्मदिनाच्या निमित्ताने त्यांच्या उभ्या आयुष्यातील कार्याचा लेखाजोगा व अल्पसा परिचय…

आबासाहेबांना प्राथमिक शिक्षण घेत असल्यापासून कब्बडीची आवड. शिक्षक झाल्यानंतरही त्यांनी कब्बडीची मैदाने गाजविली. राज्यस्तरापर्यंत त्यांच्या संघाने मजल मारली. केवळ मैदानी खेळातच नाही, तर पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक नाटकांतून समाजाचे प्रबोधन करण्यात त्यांनी दिलेले योगदान आजही तालुकावासीयांच्या स्मरणात आहे. शिक्षक असूनही ज्याचा समाजाशी संबंध येत नाही तो केवळ नोकरदार असतो, आबासाहेब दळवी हे हाडाचे समाजवादी. सीमाप्रश्नाच्या चळवळीशी जवळून संबंध आला. सरकारी नोकरीत असतांनाही कधी त्यांनी मराठी भाषाभिमान बाळगण्यात कच खाल्ली नाही. त्यांच्या हितशत्रूनी त्यावरून त्यांना अनेकवेळा खिंडीत गाठण्याचा प्रयत्नही केला. पण, मातीशी नाळ जुळलेले आबासाहेब मातीत लोळून निगरगठ्ठ बनले होते. त्यात ते कब्बडीपट्टू त्यामुळे त्यांनी प्रत्येकवेळी सहिसलामत सुटका करून घेतली.
केवळ शिक्षक म्हणून नोकरी करणे त्यांच्या रक्तात नव्हते. शिक्षक नेते म्हणून त्यांनी शिक्षकांच्या समस्यांना अंगार फुलविला. प्रसंगी त्यांनी मस्तवाल राजकारण्यांना अंगावर घेऊन शिक्षकी पेशाचे स्वातंत्र आणि स्वायतत्ता जपली. शिक्षकांची पतसंस्था असेल, शिक्षक संघटना असेल, सेवेत असेपर्यंत त्यांचे वर्चस्व राहिले. निवृत्तीनंतरही आजच्या पिढीतील शिक्षक मंडळींना याकामी त्यांच्या मार्गदर्शनाची गरज भासावी, हे त्यांच्या कार्याचे संचीत आहे.
नोकरी-समाजकार्य करतांना एखाद्याचे सहज कुटूंबाकडे दुर्लक्ष होऊन जाते. आबासाहेबांनी ही आघाडीदेखील लिलया सांभाळली. पत्नी अरूंधती यादेखील शिक्षिका, त्यांनीही दुर्गम अशा देगाव गावापासून त्यांच्या सेवेची सुरूवात केली. अनेक शाळांमधून ज्ञानदानाचे कार्य इमानेइतबारे केलेच, शिवाय आबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिक्षक संघटना, शिक्षकांची पतसंस्था यावर त्यांनी सदस्या, अध्यक्षा म्हणून काम करतांना शिक्षकाभिमूख निर्णय घेतले. दोघेही शिक्षक त्यामुळे बरीच ओढाताण झाली खरी, पण त्याचा कुटूंबावर परिणाम होऊ न देण्याचे कसब आजच्या नव्या पिढीसाठी धडाच आहे.
त्यांचा मोठा परिवार , सहा मुली, एकुलता मुलगा असे कुटूंब. मुली आहेत, म्हणून शिक्षणाच्या बाबतीत कंजूषी करणे, आबासाहेब आणि अरूंधती या दांपत्याच्या कार्यकतृत्वाला शोभणारे नव्हते. किंबहूना त्यांना त्यांच्या मुलींना उच्चशिक्षित करायचे होते. त्यांनी त्यांचे ध्येय पूर्ण केले. त्यांची मोठी मुलगी सौ. शितल बी.ए., सौ. तेजस्विनी बी.ए. संगणक डिप्लोमा, सौ. स्नेहल एम.ए.बीएड., सौ.मिनल बी.ए., सौ. स्मितल एम.सी.ए., सौ. किशोरी ही एम.एस्सी पॅथॉलॉजी करून मेडीकल लॅब टेक्नीशियनमधील तज्ज्ञ आहे. मुलगा प्रसादसिंह एम.एस्सी, एम.टेक असून मल्टीनेशनल कंपनीत संशोधनाचे काम करतो. तर स्नुषा सौ. गायत्रीदेवी, बी.एस्सी, सॅडेक डिप्लोमाचे शिक्षण घेऊन पुणे येथील डब्लू. एन.एस. या मल्टीनॅशनल कंपनीत कार्यरत आहेत.
आयुष्यभरात पुरस्कारांची थैलीच…
श्रीयुत आबासाहेब दळवी यांनी शिक्षक म्हणून काम करता करता अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानावर दिलेच शिवाय त्यांच्या कार्याची दखल येऊन शिक्षण विभागाने,1994-95 सालचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, 2009-10 जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, प्रगती इन्स्टीट्यूट ऑफ कॉमर्सचा उत्तम कब्बडीपट्टू पुरस्कार
2010 गोवा राज्यस्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार, खानापूर तालुका पत्रकार संघाने सन्मानित केले.
2011 कोल्हापुरी बाणा शिक्षक भूषण पुरस्कार, श्रमजीवी समाज गौरव, दापोली, जनसेवा पुरस्कार, पुणे- जनसेवा कला अभियान महाराष्ट्र राज्य, राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, दृष्टी फाउंडेशन पणवेल-रायगड, डॉ. मणिभाई देसाई राष्ट्रीय सेवा पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार-जळगाव, श्रमशक्ती एकता सेवा समिती राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार, वैभव महाराष्ट्राचा गुणगौरव पुरस्कार, कोंढवा-पुणे, छावा युवा पुरस्कार, पुणे, समता साहित्य अकादमीचा (मुंबई) राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार, भीमरत्न पुरस्कार, भीमराय कला अकादमी, परळ-मुंबई, महाराष्ट्र भुषण पुरस्कार, ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया, मुंबई, राज्यस्तरीय संकेत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार, संकेत क्रीडा प्रतिष्ठाण, पुणे, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रगती महिला सामाजिक विकास संस्था, नाशिक, मानवता पुरस्कार, सत्यम-शिवम सुंदरम ग्रुप, पुणे, कोकण गौरव पुरस्कार, हुतात्मा अपंग बहुउद्देशिय विकास संस्था, कराड, आदर्श शिक्षक पुरस्कार, लोकशाहि अण्णाभाऊ साठे स्मृती, औरंगाबाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकमित्र पुरस्कार बुध्दस्थान धुळे, इंडियन प्राईड एज्यूकेशन पुरस्कार, अर्जुन चॅरिटेबल फाऊंडेशन कोरेगाव-सातारा, जनकल्याण गौरव पुरस्कार, जनकल्याण सामाजिक संस्था, कोल्हापूर, श्रीमंत शाहू महाराज परिवर्तक पुरस्कार, पुणे, विशाल पुरंदर राज्यस्तरीय पुरस्कार, पुरंदर-पुणे, राज्यस्तरीय समाजगौरव पुरस्कार, कै. रामकृष्ण धोंडीराम काकडे ट्रस्ट, बेडकीहाळ-चिकोडी, साने गुरूजी आदर्श शिक्षक पुरस्कार, जनसेवा कला-क्रिडा अभियान महाराष्ट्र राज्य
२०१२ चा राष्ट्रीय वारसा गोवा पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार, साईअनिष्ठान पुणे, भारत सरकारच्यावतीने राष्ट्रपती पदक आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर २०१२ रोजी विज्ञान भवन नवी-दिल्ली येथे तत्कालीन राष्ट्रपती महामहीम प्रणव मुखर्जी आणि तत्कालीन केंद्रीय मणुष्यबळ मंत्री कपिल सिब्बल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
२०१४ खानापुरातील लोकमान्य भवन येथे ७ सप्टेंबर २०१४ रोजी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य एकसष्टी सोहळा साजरा करण्यात आला