खानापूर / प्रतिनिधी : मे महिन्याच्या रेशन तांदूळ कोट्यात प्लास्टिक तांदूळ मिश्रित असल्याचा प्रकार अनेक राशन दुकानातून उघडकीस आला आहे. यामुळे खानापूर तालुक्यात रेशनचे तांदूळ नको रे बाबा म्हणण्याची वेळ गोरगरिबांच्या वर आली आहे.
खानापूर तालुक्यात मार्केटिंग सोसायटी अंतर्गत पुरवठा करण्यात येत असलेल्या तालुक्यातील राशन दुकानात मे महिन्यातील तांदूळ वाटप प्रक्रिया सुरू आहे. परंतु वितरित करण्यात येत असलेल्या तांदळामध्ये प्लास्टिक कोटिंग असलेले तांदूळ आढळून आल्याने सर्वसामान्य नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. खानापूर तालुक्याच्या अनेक राशन दुकानातून हा प्रकार उघडकीस आला आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासून चापगाव येथील राशन दुकानातून राशन तांदूळ विक्रीत करण्यात आले. परंतु अनेक नागरिकांनी तो शिजवण्यासाठी भांड्यात घेतला असता प्लास्टिकचे तांदूळ पाण्यात तरंगत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक सामान्य नागरिकांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केली आहे. ग्रामपंचायत सदस्य नागराज येळूरकर यांनी यासंबंधी राशन दुकानदार यांच्याकडे तक्रार केली. तसेच ग्रामपंचायतीमार्फत वरिष्ठाकडे तक्रार करण्यासाठी सूचना करण्यात आली आहे.
या संदर्भात चापगाव येथील राशन दुकानदार मालक महादेव दळवी यांच्याकडे चौकशी केली असता रेशन तांदूळ कोटा मार्केटिंग सोसायटी मार्फत सर्व दुकानात पुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये प्लास्टिक तांदूळ मिस्त्रीत असल्याचे दिसून आले आहे. या संदर्भातही आपण तालुका अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांना रितसर कळवले असल्याची माहिती त्यांनी दिली.