खानापूर : प्रत्येकाने भक्ती मार्गावर चालणे आवश्यक असून संतांचे विचारच आपल्याला चांगला मार्ग दाखवू शकतात. असे प्रतिपादन हलकर्णी येथील कीर्तनकार कृष्णमूर्ती बोंगाळे यांनी केले. हलशीवाडी येथिल ग्रंथराज श्री पारायण सोहळ्याची रवीवारी सांगता होणार असून भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हलशीवाडी येथे शुक्रवारपासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून प्रारंभी हलशी येथिल सटवाप्पा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोथी स्थापना करण्यात आली. प्रारंभी कृष्णराव देसाई, निंगाप्पा देसाई, रमेश देसाई, विठ्ठल देसाई यांच्या हस्ते फोटो पूजन करण्यात आले. यावेळी वामन देसाई, राजू देसाई साई सुतार, नरसिंग देसाई, विष्णू देसाई, मल्लाप्पा सुतार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कीर्तनकार बोंगाळे यांनी संत महात्म्यानी समाज प्रबोधनाचे काम मोठ्या प्रमाणात केले असून त्याच मार्गाने आज वारकरी वाटचाल करीत आहेत. राम कृष्ण हरीचा गजर करीत प्रत्येकाने दररोज नाम संकीर्तन करणे गरजेचे असून प्रत्येकाने संतांचे विचार आत्मसात कळवावेत आणि पुढील वाटचाल करावी असे मत व्यक्त केले.
त्यानंतर मेरडा येथिल भजनी भारुडचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भजनी भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमाला हलशीवाडी ग्रामस्थांसह गुंडपी, नरसेवाडी आधी भागातील वारकरी व नागरिक उपस्थित होते.
रविवारी सकाळी गावामध्ये दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता काला कीर्तन होणार असून बारा वाजल्यापासून महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.