IMG-20230206-WA0074

खानापुरात मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सामान्य ज्ञान स्पर्धेत 1200 विद्यार्थ्यांचा सहभाग.

खानापूर लाईव्ह.

मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान ही संस्था गरीब, शेतकरी आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक व शिक्षणेतर उपक्रम कायम राबवित आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये सहभागी होऊन सामाजिक व वैयक्तिक प्रगती करावी. आतापासूनच मोठी स्वप्ने बघून प्रयत्नांनी यश गाठावे असे आवाहन वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी यांनी केले.
येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सातव्या सामान्य ज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर होते.
लायन्स क्लबचे अध्यक्ष आणि मराठा मंडळ महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य बी. एम. हम्मनवर म्हणाले, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवांमध्ये काम करण्याची मोठी संधी उपलब्ध आहे. परीक्षेचे योग्य तंत्र आत्मसात करून आतापासूनच अभ्यासाचे पक्के नियोजन केल्यास प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करता येते. त्यासाठी अवांतर वाचन आणि नियमित सरावाची सवय लावून घ्या असे आवाहन केले.
माजी जि पं सदस्य विलास बेळगावकर यांनी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय सेवांच्या परीक्षांची आवश्यक पूर्वतयारी होण्यासाठी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून सुरू असलेले प्रयत्न भविष्यात सरकारी नोकऱ्यांमध्ये तालुक्याचा टक्का वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचे सांगून जांबोटी आणि कणकुंबी भागातील विद्यार्थ्यांसाठी जांबोटी पतसंस्था देखील हातभार लावत असल्याचे सांगितले. आपचे नेते भैरू पाटील यांनी, पदवी पूर्व आणि महाविद्यालयांमध्ये यूपीएससी, केपीएससी, एमपीएससी परीक्षांच्या मार्गदर्शनाची सोय होणे आवश्यक असल्याचे सांगितले. अध्यक्ष कापोलकर बोलताना म्हणाले, विद्यार्थ्यांची गरज ओळखून स्पर्धा परीक्षांवर आधारित पुस्तके आणि मार्गदर्शन साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. वाचनालय आणि अभ्यासिकेची सोय करून स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी तज्ञांची व्याख्याने आयोजित करणार असल्याचे सांगितले. करंबळचे सामाजिक कार्यकर्ते
कल्लोजीराव घाडी, विद्याभारती पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. रामगुरवाडी ग्रा. पं. चे सदस्य विनोद कदम, म. ए. युवा समितीचे सदानंद पाटील, निट्टुर ग्रा. पं सदस्य जोतिबा गुरव, विठ्ठल गुरव, मऱ्यापा पाटील, ग्रा. पं सदस्य प्रसाद पाटील आदी उपस्थित होते. वासुदेव चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रल्हाद मादार यांनी आभार मानले.

1200 विद्यार्थ्यांचा सहभाग

यावर्षी सामान्य ज्ञान परीक्षेत तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून 1200 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह आणि शिक्षक, पालकांची मिळालेली साथ या जोरावर स्पर्धेचे नेटके नियोजन करण्यात आले होते. लायन्स क्लबचे अध्यक्ष प्राचार्य बी. एम. हम्मन्नवर यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक प्रमाणपत्रे देण्यात आली,

Do Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Call Us