जांबोटी/प्रतिनिधि
तीर्थकुंडये येथील श्री रामलिंगेश्वर देवस्थान कमिटी, तीर्थकुंडये व कौलापूरवाडा महाशिवरात्री उत्सव कमिटी यांच्यावतीने आयोजित कुस्ती मैदानात पै.अली इराण याने पंजाबच्या पै. मनी याच्यावर अवघ्या एका मिनिटात खडी टांग डावावर चितपट करत तीर्थकुंडये मैदान मारले. या मैदानात चटपटीत ४१ कुस्त्या रंगल्या.
प्रथम क्रमांकाची कुस्ती पैअली इराण वि. पै.मनी पंजाब यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक व भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते लावण्यात आली.
आखाड्याचे उद्घाटन भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत अली इराण याने आक्रमक होत पहिल्याच मिनिटाला मनी पंजाबला चितपट करताच कुस्ती शौकिनांनी एकच जल्लोष केला. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पै.सबी पंजाब याने पै.भोला हरियाणा याचा १५ व्या मिनिटाला पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पानिपतच्या पै.निर्मल देशवाला याने २० मिनिटाच्या संघर्षानंतर कर्नाटक केसरी पै.संगमेश बिराजदार याला अस्मान दाखवले. शिवाय पुजारी याने अभिजित कोल्हापूर याला चितपट केले. किर्तीकुमार कंग्राळी, रोहित कंग्राळी, भीमशी काटे, यांनी विजय मिळविला. तर रुपेश करले वि. उमेश बागलकोट यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. निवेदन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले.
तीर्थकुंड मैदानात महिला पैलवानांच्या दोन कुस्त्या खेळविण्यात आल्या. दोन्ही कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या तरी मुलींच्या डाव प्रतिडावांना उपस्थितांनी दाद दिली. पहिली कुस्ती सानिका कडोली वि. राधिका वाघवडे यांच्यात तर दुसरी कुस्ती राधिका संतीबस्तवाड वि. शीतल खादरवाडी यांच्यात खेळविण्यात आली.