खानापूर: खानापूर तालुक्यात गेल्या साडेचार वर्षांपासून विभागलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीत मध्यवर्तीच्या पुढाकाराने एकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तालुका समितीच्या तीन पदाधिकाऱ्यांची प्राथमिक नियुक्ती करण्यात आली आहे मात्र त्यानंतरची विस्तारित कार्यकारिणी समिती तसेच विभागीय समित्या नेमणुकीची प्रक्रिया पूर्ण करणे प्रलंबित राहिल्याने खानापूर तालुक्यात विभागीय बैठका घेऊन संघटना बळकट करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर हाती घेण्यात यावी अशी मागणी गुरुवारी झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आली. यानुसार येत्या शनिवार पर्यंत मध्यवर्ती समितीकडे सादर करण्यात आलेल्या खानापूर तालुक्यातील कार्यकारणीच्या यादीत सुधारणा करून त्यामध्ये नवीन नावे समाविष्ट करून संमती पत्रानुसार कार्यकारणीची पुनर्रचना करणे तसेच खानापूर तालुक्यात जिल्हा पंचायत निहाय उपाध्यक्ष व खानापूर शहर उपाध्यक्ष तसेच एका खजिनदराची नियुक्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते.
प्रारंभी उपस्थिताचे स्वागत म. ए. समितीचे सेक्रेटरी सिताराम बेडरे यांनी करून बैठकीतील विषयाची मांडणी केली. कार्याध्यक्ष यशवंत बिरजे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बळकटीत सर्वांना समाविष्ट करून आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती पावले उचलावीत. याचे विचार मांडावेत असे सांगितले व तयार करण्यात आलेल्या कार्य करण्याची यादी वाचन करून त्यामध्ये शनिवार पर्यंत प्रत्येकाने आपापले समिती पत्र जोडून विस्तारित कार्यकारिणी करण्यात यावी असा ठराव या बैठकीत घेण्यात आला
यावेळी माजी आमदार दिगंबर पाटील,विलास बेळगावकर, पुंडलिक चव्हाण, मारुती परमेकर, नारायण लाड, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत
पदाधिकाऱ्यांची निवड जिल्हा पंचायत निहाय ग्रा प प्रमुख, खजिनदार, कार्यकारिणी संमती पत्र घेणे गावागावात दौरा,रूपरेषा, खानापूर तालुका समिती उप समितीची रचना करणे, विधानसभेच्या इच्छुकांची यादी घेणे, आधी विषयावर अनेकांनी विषय मांडले तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यात समितीला झोकून देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची निवड कार्यकारणी समितीमध्ये झाली पाहिजे. समितीला आतापर्यंतच्या इतिहासात जनतेने पैसा देऊन निवडून दिले आहे. यासाठी येणाऱ्या निवडणुकीत पैशापेक्षा राजकारणात लोकांच्या पर्यंत एकनिष्ठता व विचारधारा घेऊन सीमा प्रश्नाचा न्यायालयीन लढा याची तळागाळातील माणसं पर्यंत माहिती पोहोचवून पुन्हा एकदा सीमा लढ्यासाठी मराठी मतदारांना विश्वास दाखवला पाहिजे असे विचार अनेकांनी मांडले.
गेल्या 70 वर्षात समितीच्या जीवावर अनेकानी समितीची पदे भोगले आहेत. अशा माजी लोकप्रतिनिधींना समितीच्या प्रवाहात पुन्हा एकदा झोकुन कामाला लावले पाहिजे तसेच आगामी महिन्याभरात महाराष्ट्र एकीकरण समितीचा एक भव्य असा मेळावा खानापुरात भरून पुन्हा एकदा समितीची दाखल राष्ट्रीय पक्षांना दाखवून मराठी माणसांना एकीच्या झेंड्याखाली आणावे असे विचार अनेकांनी यावेळी मांडले.