ओलमणी: महाशिवरात्रीच्या निमित्ताने रविवारी अमावस्या निमित्त बेळगाव तालुक्यातील बहादरवाडी येथील काही युवक मलप्रभा नदी काठावरील ओलमनी नजीकच्या रेडीकुंडी डोहाजवळ अंघोळी करताना पाण्यात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.
या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव राहुल मनोहर मुळीक वय 28 (रा. बहादरवाडी) असे आहे.
याबाबत मिळालेली माहिती की, रविवारी अमावस्या निमित्ताने बहादरवाडी येथील काही युवक ओलमणी नाजिक नदी काठावर आंघोळीसाठी आले होते.दरम्यान आंघोळी करत असताना राहुल अचानकपणे पाण्यात बुडाला. जवळ असलेल्या युवकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.परंतु पाण्याचा अंत लागला नसल्याने तो बुडाला. तातडीने सर्वत्र शोधाशोध केली. पण त्या ठिकाणी असलेल्या डोहात खोलवर पाणी असल्याने राहुलचा मृतदेह सापडला नाही. खानापूर अग्निशामक दलाला ही पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेहाची शोधाशोध केली, परंतु मृतदेह सापडला नाही. दरम्यान खानापूर पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक राठोड, एन के. पाटील तसेच हवालदार जयराम यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शोधण्यासाठी सहकार्य केले. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह सापडला नाही. त्यामुळे पुन्हा सोमवारी सकाळी शोधाशोध केली जाणार आहे.
राहुल हा एक हुरउन्नरी युवक होता. सर्व युवकांच्या मध्ये मिळून मिसळून राहण्याची त्याची सवय होती. त्याच्या दुर्दैवी निधनाबद्दल सर्वत्र शोक पसरला आहे.त्याच्या पक्षात आई-वडील, दोन विवाहित बहिणी, असा परिवार आहे.